बिर्याणी आणि बटर चिकनसारखे पदार्थ तर परदेशातील अनेक रेस्टॉरंटमध्ये सहज मिळतात, पण खरी मजा तेव्हा येते जेव्हा चहासोबत पारले-जीसारखा बिस्किटाचा पॅक, हल्दीरामची आलू भुजिया किंवा खमंग नमकीन खायला मिळेल. तेव्हा कुठे आपल्या मनाची शांती होते. पण तुम्हाला माहितीय का की आपल्या भारतात मिळणाऱ्या वस्तूंची परदेशात किंमत किती आहे?
खरंतर भारतीय वस्तूंचा परदेशातील किंमतींचा आकडा हा खरोखर थक्क करणारा आहे.
advertisement
अमेरिकेतील डलास येथे असलेल्या वॉलमार्ट स्टोअरमधून नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्याने अनेक भारतीयांच्या भावना जाग्या केल्या. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं की वॉलमार्टच्या शेल्फवर भारतीय स्नॅक्स आणि रेडी-टू-ईट पॅकेज्ड फूड्स अगदी ‘मिनी इंडिया’सारखे सजवले होते.
कोणकोणते पदार्थ दिसले?
या शेल्फवर पारले-जी, हाइड अँड सीक बिस्किट्स, फरसाण, मसाले, रेडी-टू-ईट पदार्थ, खट्टा-मीठा नमकीन, आलू भुजिया असे सर्व काही पाहायला मिळालं. कंटेंट क्रिएटरने दाखवले की रॉयल मसूर डाळ आणि मूग डाळ प्रत्येकी 4 डॉलर (सुमारे 350 रुपये) दराने विक्रीस ठेवली होती. खट्टा-मीठा नमकीन आणि आलू भुजिया देखील याच श्रेणीत होते.
मसाल्यांच्या रॅकमध्ये बिर्याणी मसाला, तंदुरी मसाला, फ्रायड फिश मसाला, बटर चिकन सॉस असे मसाले उपलब्ध होते. रेडी-टू-ईट बिर्याणी फक्त 3 डॉलर (सुमारे 260 रुपये) ला विक्रीस ठेवली होती. पारले हाइड अँड सीक बिस्किट्सची किंमत 4.50 डॉलर (सुमारे 400 रुपये) होती.
या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. कुणी म्हणाले, “वा, पण किती महाग आहे!” तर काहींनी मजेत लिहिले, “पटेल भाई सगळं डबल प्राइसला विकत आहेत.” एका युजरने लिहिले, “भारतामध्ये 500 रुपयांत काही खास मिळत नाही, पण अमेरिकेत 96 डॉलरच्या पगारात खूप काही विकत घेता येतं.” तर काहींनी कॅनडाशी तुलना करत किंमती थोड्या जास्त असल्याचं नमूद केलं.
किंमत जास्त का?
जरी किंमत भारतापेक्षा जास्त आहे, तरीही अमेरिकेसारख्या देशांमध्ये किमान वेतन 7.25 डॉलर (सुमारे 580 रुपये प्रती तास) आहे. अशा परिस्थितीत तेथील लोक हे स्नॅक्स सहजपणे खरेदी करू शकतात. परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी ही उत्पादने फक्त खाण्याच्या वस्तू नसून त्यांच्या भावनांशी जोडलेलं नातं आहेत.
