ही घटना आंध्र प्रदेशातील तिरुपतीजवळील एस.व्ही. प्राणी संग्रहालयाच्या (SV Zoo Park) रस्त्यावर मध्यरात्री घडली. एका कारच्या डॅशकॅममध्ये हा थरारक प्रसंग कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की, दुचाकी जशी पुढे जाते तशी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीतून अचानक बिबट्या धाव घेतो आणि बाइकवर झेपावतो. काही इंचांच्या अंतराने बाईकस्वारांचा जीव वाचतो आणि बिबट्या पुन्हा अंधारात निघून जातो.
advertisement
विशेष म्हणजे, बाईकस्वार आणि मागे बसलेला व्यक्तीला बिबट्या असल्याचं काही क्षणासाठी जाणवत देखील नाही. त्यांनी गाडी न थांबवता वेगाने पुढे नेली आणि अनपेक्षितपणे स्वतःचा जीव वाचवला.
या घटनेनंतर तिरुपती परिसरात वाढत चाललेल्या बिबट्याच्या हालचालींबद्दल नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. विशेषतः तिरुमला आणि अलीपीरी पादचारी मार्गांवर अशा घटना वारंवार घडत आहेत. मार्च महिन्यातही एका बिबट्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं, जे अलीपीरी फूटपाथजवळील गळिगोपुरम दुकानांच्या भागात मध्यरात्रीच्या सुमारास फिरताना दिसला होता. त्या वेळी सुदैवाने कोणीही भाविक त्या ठिकाणी उपस्थित नव्हते.
या पार्श्वभूमीवर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) संस्थेने पूर्वीच काही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. भाविकांना समूहामध्ये चालण्यास सांगण्यात आलं होतं.
या घटनेमुळे पुन्हा एकदा तिथल्या वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी त्वरित पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.