भारत सोडला तर आजकाल अनेक देशांमध्ये परदेशी घरकामगार (मेड) यांना रोजगार देताना कठोर नियम पाळले जातात. यामागील उद्देश म्हणजे कामगारांचे हक्क सुरक्षित ठेवणे आणि त्यांच्याकडून जास्तीचं किंवा अनधिकृत काम करवून घेणं टाळणं. सिंगापूरमध्येही अशाच नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे एका 53 वर्षीय फिलिपिनो घरकामगारावर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.
ओकॅंपो पिडो एरलिंडा नावाच्या या महिलेने सुट्टीच्या दिवशी दुसऱ्या कुटुंबासाठी साफसफाई आणि घरकाम केलं होतं, जे तिच्या वर्क पासच्या अटींचं उल्लंघन होतं. यामुळे सिंगापूरच्या अधिकाऱ्यांनी तिच्यावर 13,000 सिंगापूर डॉलर्स (सुमारे 8.8 लाख रुपये) इतका दंड ठोठावला आहे.
advertisement
सिंगापूरच्या मिनिस्ट्री ऑफ मॅनपॉवर (MoM) ने या प्रकरणाची चौकशी डिसेंबर 2024 मध्ये सुरू केली, जेव्हा त्यांना या उल्लंघनाबाबत माहिती मिळाली. तपासात उघड झालं की ओकॅंपो 2018 ते 2020 या कालावधीत सो ओई बेक नावाच्या स्थानिक महिलेकरिता आठवड्यातून एकदा काम करत होती आणि त्याबदल्यात तिला 375 सिंगापूर डॉलर्स मिळत होते. तिच्या कामात झाडलोट, कपडे इस्त्री करणं आणि पंख्यांची साफसफाई यांचा समावेश होता.
ओकॅंपोने फेब्रुवारी 2020 मध्ये कोविडच्या कारणामुळे हे काम थांबवलं होतं. मात्र, तिने 2022 ते 2024 दरम्यान पुन्हा बेकच्या घरात काम करण्यास सुरुवात केली, आणि त्या काळातही तिच्याकडे अशा प्रकारच्या कामासाठी वैध वर्क पास नव्हता. याशिवाय, ओकॅंपोने पुलक प्रसाद या बेकच्या बॉससाठीही 2019 ते 2020 या काळात काम केलं होतं, जिथे तिला महिन्याला 450 सिंगापूर डॉलर्स मिळत होते. ती त्यांच्या घरी डस्टिंग, व्हॅक्युमिंग आणि बेडशीट बदलण्यासारखी कामं करत होती.
फक्त ओकॅंपोवरच नाही तर 64 वर्षीय सो ओई बेक यांच्यावरही 7,000 सिंगापूर डॉलर्स (सुमारे ४.७ लाख रुपये) इतका दंड आकारला गेला, कारण त्यांनी बेकायदेशीररीत्या मेडला कामावर ठेवलं होतं. दोघांनीही आपापली दंडाची रक्कम भरली आहे, परंतु पुलक प्रसाद यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली का याची माहिती स्पष्ट नाही.
सिंगापूरमध्ये वर्क पास असलेल्या कामगारांना फक्त त्या नियोक्त्यासाठीच काम करण्याची परवानगी असते, ज्याचं नाव त्यांच्या दस्तऐवजांवर नोंदलेलं असतं. कोणतंही अतिरिक्त काम मग ते सुट्टीच्या दिवशी असो किंवा पार्ट-टाइम बेकायदेशीर मानलं जातं. मिनिस्ट्री ऑफ मॅनपॉवरने या प्रकरणाच्या माध्यमातून इशारा दिला आहे की, मेडला बेकायदेशीररीत्या कामावर ठेवणं किंवा कोणताही नियम मोडणं यावर कठोर कारवाई केली जाईल.
