जालना : प्रत्येकाकडे काही ना काही जन्मसिद्ध गुणवत्ता कौशल्य असतात. मात्र योग्य वेळी त्याची ओळख न झाल्याने किंवा कोणीतरी योग्य मार्गदर्शक न मिळाल्याने ही कौशल्ये तशीच राहून जातात. पुढे आयुष्यात या गोष्टींची जाणीव होऊनही त्याचा आयुष्य सुखकर बनवण्यासाठी काहीही उपयोग होत नाही. जालना शहरातील मंगेश अंभोरे याची कहाणी देखील अशीच आहे. शहरातील एका टी स्टॉलवर चहा बनविण्याचे काम करणारा मंगेश पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मराठी सिने अभिनेते निळू फुले यांची हुबेहूब नक्कल करतो. पण योग्य वेळी आपल्यातील कलागुणांची ओळख न झाल्याने त्याची ही मिमिक्री आता केवळ कॉमेडी पुरती मर्यादित राहिली आहे. पाहुयात अंगात कलाकारी हिणलेला परंतु परिस्थितीमुळे कलाकार होऊ न शकलेल्या मंगेश अंभोरे याची ही कहाणी.
advertisement
मंगेश अंभोरे हा जालना शहरातील या हनुमान घाट भागात राहतो. त्याचे केवळ चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण झाले आहे. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने चौथीनंतर त्याने शाळा सोडली आणि आपल्या कुटुंबाला वेगवेगळी कामे करून हातभार लावू लागला. अनेक दिवस शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली केली. मिळेल ते काम केले.
ते दृश्य पाहिलं अन् पुणेकर तरुणानं बनवला जगातला सर्वात लहान पिझ्झा
त्यानंतर तो हॉटेल व्यवसायाच्या लाईनमध्ये शिरला. मागील पंधरा वर्षांपासून तो चहा बनवण्याचे कामगार म्हणून करत आहे. सध्या त्याला दिवसाला सहाशे रुपये हजेरी मिळते. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका चहा दुकानावर तो काम करतो.
जीवनातले वेगवेगळे ताण तणाव घेऊन लोक चहाच्या दुकानावर येतात. चहाची घोट घेत आपसात चर्चा करतात. पण जीवनातील ताण हलका करण्याचा प्रयत्न करतात. त्यात मंगेश आपल्या कलाकारीने लोकांना खळखळून हसवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुबेहूब मिमिक्री करण्याची कला तो कोरोना लॉकडाऊनमध्ये शिकला. यानंतर निळू फुले यांचाही हुबेहूब आवाज तो काढून दाखवतो.
आणखीही काही आवाज शिकण्याची इच्छा आहे. पण आता कामातून वेळ मिळत नाही. मला अनेक जण म्हणतात तू मुंबईत असता तर चांगला कलाकार झाला असतास परंतु बेताचीच परिस्थिती असल्यामुळे मी मुंबईत जाऊ शकलो नाही. आता लोकांचे टेन्शन हलके करण्याचे काम या माध्यमातून करत असतो. याचे मला समाधान आहे, असं मंगेश अंभोरे याने लोकल 18 शी बोलताना सांगितले.