मुंबई क्राइम ब्रँचच्या युनिट-9 ला गुप्त माहिती मिळाली की बांद्रा रेल्वे स्टेशनजवळील एका केळ्याच्या ठेल्यावरून केवळ फळं विकली जात नव्हती, तर काहीतरी मोठं बेकायदेशीर काम सुरू होतं.
पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये पाळत ठेवली आणि योग्य वेळ साधत 60 वर्षीय मोहम्मद अली अब्दुल गफ्फार शेख याला महाराष्ट्रनगर रोडवर पकडलं.
सुरुवातीला साधं दिसणारं ठेलं पोलिसांनी चेक केलं, तेव्हा स्टीलच्या डब्यात लपवलेले 153 ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळले. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत तब्बल 35.50 लाख रुपये आहे.
advertisement
चौकशीत मोहम्मद अलीने कबूल केलं की, स्थिर नोकरी न मिळाल्याने त्याने केळी विक्री सुरू केली होती. पण त्यातून पुरेसा नफा मिळत नव्हता. आर्थिक संकट आणि गरजेपोटी त्याने ड्रग्ज तस्करीचा मार्ग स्वीकारला.
पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास
मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि एनडीपीएस अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर 3 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आता पोलिस हे शोधत आहेत की, त्याचे अजून साथीदार होते का? आणि हे रॅकेट किती काळापासून सुरू होतं?
अलीकडेच वडाळा येथे 51 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या सततच्या कारवाया दाखवतात की मुंबई पोलिस ड्रग्जच्या जाळ्यावर कायमच घाव घालत आहेत.