1990 च्या दशकात वैज्ञानिकांनी सांगितले होते की पुढील 30 वर्षांत समुद्रपातळी साधारण 8 सें.मी. ने वाढेल. प्रत्यक्षात मात्र ही वाढ जवळपास 9 सें.मी. झाली आहे. म्हणजेच जुने अंदाज अचूक ठरले आणि आधी वर्तवलेल्या अंदाजापेक्षाही जास्त ही वाढ झाली आहे.
अलीकडील अभ्यासानुसार, ही वाढ आता अधिक वेगाने होत आहे. 2024 मध्ये समुद्रपातळी 0.59 सें.मी. ने वाढली, जी अपेक्षित वाढीपेक्षा जास्त आहे.
advertisement
पण आता प्रश्न असा की वेगाने का वाढतेय पातळी?
ग्रीनलँड आणि अंटार्क्टिका मधील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळत आहे.
जमिनीखालचा पाणीसाठा (ग्राउंडवॉटर) कमी होऊन त्याचे पाणी समुद्रात मिसळत आहे. शिवाय गरम झालेलं समुद्राचं पाणी स्वतः प्रसरण पावतं आहे. यामुळे समुद्रपातळी पूर्वीपेक्षा जास्त वेगाने वाढते आहे.
मुंबईसाठी काय अलर्ट?
मुंबईसारखं समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं शहर समुद्रपातळी वाढीच्या थेट धोक्यात आहे. जर ही वाढ असंच सुरू राहिली तर पुढील काही दशकांत मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. वैज्ञानिक सांगतात की, “समुद्रपातळी सर्वत्र सारखी वाढत नाही, पण किनारी शहरांमध्ये तिचा सर्वाधिक परिणाम दिसतो.” म्हणून मुंबईसाठी हा इशारा अधिक गंभीर आहे.
थोडक्यात, 30 वर्षांपूर्वीचा अंदाज आता खरा ठरतो आहे आणि त्याचा फटका मुंबईसारख्या महानगरांना बसण्याची शक्यता सर्वाधिक आहे. हवामान बदलाला रोखण्यासाठी आजपासूनच उपाययोजना न केल्यास भविष्य अत्यंत धोकादायक ठरू शकते.
