जनरेशन Z म्हणजेच तरुण पिढीचं म्हणणं आहे की, राजकारण्यांची मुलं मेहनत किंवा पात्रता नसतानाही ऐशोआरामाचं आयुष्य जगतात. त्यांना न मिळालेल्या संधींवर ते हक्क गाजवतात. यामुळे त्यांना आयुष्यात पुढे जाणे आणि बिझनेस करण्याची संधी मिळते. तर सामान्य नागरीक नेहमीच मागे रहात आहेत.
याच कारणामुळे सोशल मीडियावर #nepokid या हॅशटॅगसह हजारो पोस्ट्स शेअर होत आहेत. या सगळ्यात नेपाळची एक्स मिस वर्ल्ड स्पर्धक श्रिंखला खातीवाडा देखील मोठ्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.
advertisement
श्रिंखलाने 2018 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेत नेपाळचे प्रतिनिधित्व केलं होतं आणि टॉप-12 मध्ये स्थान मिळवलं होतं. त्या वेळी त्यांच्या "ब्यूटी विथ अ पर्पज" प्रोजेक्टअंतर्गत त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी आवाज उठवला होता. लोकांनी त्यांना देशाचा अभिमान मानलं होतं. मात्र, 2025 मधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. तरुण पिढी त्यांच्यावर नाराज आहे कारण देशात सुरू असलेल्या जनआंदोलनावर त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही.
श्रिंखलाच्या इंस्टाग्राम पेजवर त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासांचे फोटो, लक्झरी ब्रँड्सचे कपडे आणि फॅशन शूट्स झळकतात. यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. अनेक युजर्स कमेंट करत आहेत की “आमचा टॅक्स, यांचा फायदा”.
लोकांनी श्रिंखलाच्य शांततेवर प्रश्न उपस्थित केला आहे. “मुलांच्या शिक्षणाची वकिली करणार म्हणत होती, पण आज आंदोलनात मार खाणाऱ्या तरुणांविषयी एक शब्दही काढला नाही”.
श्रिंखला या माजी आरोग्यमंत्री बिरोध खातीवाडा आणि बागमती प्रांताच्या संसद सदस्या मुनु सिगडेल यांची मुलगी आहे. त्यांचा हा राजकीय वारसा, जो पूर्वी त्यांच्या प्रोफाइलमधील एक सामान्य तपशील मानला जायचा, मात्र आज मोठ्या वादाचा मुद्दा ठरला आहे.
1995 मध्ये हेटौड्यात जन्मलेल्या श्रिंखलाने आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले आहे आणि हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ डिझाईनमधून अर्बन प्लॅनिंगची पदवीही मिळवली आहे. मिस नेपाळ वर्ल्डचा किताब जिंकून त्यांनी मिस वर्ल्डमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं. परंतु आज त्यांची प्रतिमा "प्रेरणादायी युवती"ऐवजी "नेपो किड" म्हणून चर्चेत आहे.