पैशांची तंगी, महागाई आणि भाड्याच्या घरांचा त्रास या सगळ्याला तोंड देण्यासाठी काही विद्यार्थी असे वेडेवाकडे मार्ग शोधतात, ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. अशीच एक अनोखी कहाणी आहे ऑक्सफोर्ड विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांची लिओ बेवन आणि किट रेनशॉ.
लिओ आणि किट हे दोघं त्यांच्या कोर्सच्या शेवटच्या टप्प्यात होते. पण अडचण होती भाड्याची. वर्षाला जवळजवळ 9,000 ते 10,000 पाउंड म्हणजेच दहा- अकरा लाख रुपये घरभाडं द्यावं लागत होतं.
advertisement
लिओने पहिल्या वर्षी हॉस्टेलसाठी 7,500 पाउंड दिले, दुसऱ्या वर्षी शेअर्ड हाऊसमध्ये 6,500 पाउंड खर्च झाले. शेवटच्या वर्षी 10,000 पाउंड द्यावे लागले असते, जे त्याच्यासाठी अशक्य होतं. किटची परिस्थितीही काही वेगळी नव्हती. सुरुवातीला 4,500 पाउंड, नंतर अचानक 9,000 पाउंडची मागणी. मग त्यांना हे कळून चुकलं की इतका खर्च करणं त्यांना परवडणारं नाही.
मग सुरू झाला जुगाड. जून 2024 मध्ये लिओला फेसबुक मार्केटप्लेसवर एक जुनी, धुळकट डबल डेकर बस दिसली. किंमत होती 5,000 पाउंड (सुमारे 5.9 लाख रुपये). फक्त 30 मिनिटांत त्याने ती खरेदी केली.
बस चालण्याच्या स्थितीत नव्हती. त्यामुळे ती लिव्हरपूलवरून ऑक्सफर्डला खेचून आणण्यासाठी 1,300 पाउंड द्यावे लागले. आज ती बस एका पार्किंग एरियात उभी आहे. त्यासाठी आठवड्याला 73 पाउंड (सुमारे 8,690 रुपये) शुल्क भरावं लागतं. यात हिशोब सोपा होता वर्षाला 2,500 ते 3,500 पाउंडची बचत होणार होती.
विकत घेतलेली बस
बसला घर बनवणं ही सोपी गोष्ट नव्हती. आत शिरल्यावर त्यांना मृत उंदीर आणि बुरशी दखील लागली होती. प्रवासी सीट, ड्रायव्हर सीट, टेबल, भिंती, छप्पर सगळं काढून टाकावं लागलं.
त्यांनी हीटिंग-कूलिंग सिस्टीम बाहेर केली, पण बसमधल्या अस्सल लेदर सीट्स, कपाट, टीव्ही आणि साऊंड सिस्टम मात्र जपून ठेवले. आता ते वीजेसाठी जनरेटर आणि बॅटरी वापरत आहेत, तर जेवणासाठी एलपीजी सिलिंडर. पण यात एक अडचण होती अंघोळीची. त्यांना आंघोळीची जागा नाही, म्हणून ते मित्रांच्या घरी जाऊन आंघोळ करतात. त्याबसमध्ये फर्शी, भिंती, किचन, टॉयलेट अशी अजून बरीच कामं बाकी आहेत.
लिओ हसत सांगतो, “मी कर्ज काढून बस घेतली. आम्ही जुनं सामान उचलून वापरतोय. अजून काम बाकी आहे, पण आत्मविश्वास आहे. हे घर आम्ही तयार करूच.” दोघांचं म्हणणं आहे की, हो, हा प्रवास अवघड आहे. पण त्याचबरोबर हा अनुभव मजेदार, वेगळा आणि शिकवणारा आहे. एकदा का ही बस बनली तर त्यांचा रहाण्याचा त्रास कायमचा सुटेल.