पेट्रोलमध्ये एथेनॉल मिसळण्याच्या या नव्या नियमामुळे अनेक कार मालकांच्या मनात गोंधळ आहे. खास करून ज्यांच्या गाड्या 2023 पूर्वीच्या आहेत, त्यांना तर हा प्रश्न सतावत आहे की, E20 फ्यूलमुळे इंजिन खराब होईल का? मायलेज कमी होईल का? याच कारणामुळे अनेक जण आता प्रीमियम पेट्रोलकडे वळत आहेत. पण, खरा प्रश्न असा आहे की, प्रीमियम पेट्रोल घेतलं तरी एथेनॉलपासून सुटका होणार का?
advertisement
भारत सरकारनं पेट्रोलमध्ये एथेनॉल मिश्रण वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. E20 पेट्रोल म्हणजे 20% एथेनॉल मिसळलेलं पेट्रोल. एथेनॉल हे ग्रीन फ्यूल मानलं जातं, ज्यामुळे प्रदूषण कमी होतं आणि इंधनाच्या आयातीवर खर्चही घटतो. पण याचा परिणाम जुन्या गाड्यांवर कसा होईल, यावर सोशल मीडियावर वाद सुरु आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की, E20 फ्यूलमुळे गाडीचं मायलेज कमी होतं आणि इंजिनवर गंज येतो. एवढंच नाही तर हा विषय कोर्टातही गेला आहे.
E20 फ्यूल आल्यानंतर अनेक गाडी मालकांनी 90 ऑक्टेन प्रीमियम पेट्रोल, 95 स्पीड, XP95, पावर 95 अशा ब्रँडेड फ्यूलकडे वळायला सुरुवात केली. कारण जाहिरातींमध्ये सांगितलं जातं की, प्रीमियम फ्यूलमुळे गाडीचं परफॉर्मन्स वाढतं, मायलेज चांगलं मिळतं आणि इंजिनची स्थिती उत्तम राहते. पण यासाठी तुम्हाला नॉर्मल पेट्रोलपेक्षा 6-8 रुपये जास्त द्यावे लागतात.
पण खरी गोष्ट अशी आहे की...
प्रीमियम पेट्रोलमध्येही 20% एथेनॉल मिसळलेलं असतं. म्हणजे नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोलमध्ये आता एथेनॉलच्या प्रमाणात काहीही फरक नाही. मग का उगाच जास्त पैसे का द्यायचे?
जर तुम्हाला अजिबात एथेनॉल नको असेल, तर फक्त 100 ऑक्टेन प्रीमियम पेट्रोलचा पर्याय आहे. पण त्यासाठी तुम्हाला प्रति लिटर ₹160 पेक्षा जास्त खर्च करावा लागेल. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर, जास्तीचं पैसे मोजायचे आणि मग शुद्ध पेट्रोल वापरायचं.
आता अनेक कंपन्या स्पेशल किट्स आणायच्या तयारीत आहेत, ज्यामुळे आता E10 कंप्लायंट कारमध्येही E20 फ्यूल वापरता येईल किंवा तुम्ही फ्यूल क्लीनर वापरू शकता, ज्यामुळे एथेनॉलचा गाडीवर होणारा परिणाम कमी होईल.
E20 फ्यूलमुळे गाडी बिघडेल का, यावर अजून वाद सुरु आहेत. पण एक गोष्ट नक्की – नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल दोन्हीमध्ये एथेनॉल आहेच, त्यामुळे प्रीमियमसाठी जास्तीचे पैसे मोजून काही फायदा नाही.