भारताच्या विविध भागांमध्ये विवाहानंतर नवरी सासरी जाण्याची परंपरा आहे. पण उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील हिंगुलपूर गावाने या प्रथेच्या विरुद्ध एक अनोखी पद्धत अवलंबली आहे. येथे मुलींचे लग्न झाले तरी त्या आपले माहेर सोडत नाहीत. उलट त्यांचे नवरेच त्यांच्या घरी राहतात. यामुळेच या गावाला ‘जावयांचे गाव’ असेही म्हटले जाते.
गावाची अनोखी परंपरा – का आणि कशी सुरू झाली?
advertisement
काही दशकांपूर्वी हिंगुलपूरमध्ये हुंडाबळी आणि कन्या भ्रूणहत्या मोठ्या प्रमाणावर होत असत. या गावात मुलींच्या संख्येत घट होत असल्याने गावकऱ्यांनी एक मोठा निर्णय घेतला. लग्नानंतर मुलींना सासरी पाठवण्याऐवजी नवऱ्यालाच त्यांच्या घरी स्थायिक करायचे.
हा निर्णय हळूहळू गावातील मुस्लिम समाजानेही स्वीकारला आणि संपूर्ण गावाने या अनोख्या विवाह परंपरेला मान्यता दिली. आज या गावातील मुलींच्या विवाहासाठी हा एक महत्त्वाचा नियम बनला आहे.
गावातील जावयांसाठी विशेष सोय
हिंगुलपूरमध्ये बाहेरून येणाऱ्या जावयांना रोजगार मिळावा म्हणून गावकरी त्यांच्यासाठी रोजगाराची सोय करतात. आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून जावई येथे स्थायिक होतात: कानपूर, फतेहपूर, प्रतापगड, प्रयागराज आणि बांदा या ठिकाणांहून जावई येथे येतात. गावातील विवाहित मुली आपापल्या नवऱ्यांसह माहेरीच संसार थाटतात. पिढ्यान्पिढ्या जावई एका घरात राहतात. त्यामुळे कुटुंब मोठे आणि मजबूत राहते.
अन्य गावे देखील
हिंगुलपूर हे भारतातील एकमेव गाव नाही जिथे नवरा सासरी येतो. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील ‘बितली’ गावही ‘जावयाचे गाव’ म्हणून ओळखले जाते. या गावात देखील नवऱ्यांना सासरी जाऊन राहावे लागते.
या परंपरेमागची सामाजिक कारणे
-बेटी बचाओ मोहिमेसारखी संकल्पना: मुलींचे जीवन सुरक्षित राहावे आणि त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये, म्हणून हा निर्णय घेतला गेला.
-अनोळखी कुटुंबात मुली पाठवण्याचा धोका कमी: काहीवेळा अर्धवट माहितीवर लग्न जमवले जाते, त्यामुळे पुढे अडचणी येतात. त्या टाळण्यासाठी नवऱ्यानेच सासरी राहणे योग्य मानले जाते.
-कुटुंब एकत्र राहिल्याने मुलींना आधार: नवरा आणि सासरच्या लोकांकडून होणारा मानसिक तणाव टाळता येतो.
समाजासाठी नवा दृष्टिकोन
भारतामध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि हक्कांसाठी अनेक उपाय केले जात आहेत. हिंगुलपूरसारख्या गावांनी पारंपरिक नियम मोडून नवीन दृष्टिकोन स्वीकारला आहे. या परंपरेमुळे मुलींना सन्मान मिळतो आणि त्यांच्या भविष्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण होते. या गावाने संपूर्ण देशासाठी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
