शुभमंगल सावधान!.... मंगलाष्टका संपल्या की अंतरपाट खाली येतो आणि संपूर्ण लग्न सोहळ्यात वधू-वर एकमेकांना पहिल्यांदाच पाहतात. नकळत नजरेने सात जन्माचं वचन देतात आणि सुरू होतं एक नवं, प्रेमानं भरलेलं आयुष्य. पूर्वीचे लोक तर असं सांगतात की त्यांनी लग्नात अंतरपाट खाली आल्यावरच त्यांच्या जोडीदाराला पहिल्यांदा पाहिलं होतं. त्यामुळे तेव्हा तर हा अंतरपाट अधिकच खास होता. आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला पाहण्याची उत्सुकता त्या अंतरपाटामुळे वाढायची. दोन जीव, दोन कुटुंब एक होणार असतात, तेव्हा त्या पवित्र क्षणाला थोडा संयम, थोडा सन्मान दिला जातो. थोडक्यात अंतरपाट म्हणजे वधू-वराच्या आयुष्याची सुंदर सुरुवात आहे.
advertisement
पूर्वी अंतरपाट एक पांढऱ्या रंगाचं कापड किंवा धोतराचं असायचं. त्यावर स्वस्तिक, कलश, ओंकार अशी शुभ चिन्हं असायची. आताही ही शुभ चिन्हं असतात. कारण पवित्र मंत्रोच्चार चालू असताना ही शुभ चिन्हं वर आणि वधूचं मन एकाग्र ठेवतं. आता एकविसाव्या शतकात ट्रेंड बदलला आहे. शुभचिन्हाशिवाय अंतरपाटात बऱ्याच गोष्टी समाविष्ट केल्या जातात. यावर वधूवरांचे फोटो, त्यांची नावं, लग्नाची तारीख आणि वेळही असते. आजकालच्या तरुणांनी कुटुंबालाही या अंतरपाटात सामावून घेतलं आहे. ज्यात वधू-वरांसोबतच त्याचे आईवडील, आजी-आजोबा, काका-काकू आणि कुटुंबातील इतर सदस्यांची नावं किंवा हातांचे ठसे आशीर्वाद स्वरूपात असतात. यामुळे केवळ परंपरा जिवंत राहतेच असे नाही तर लग्न संस्मरणीय देखील बनतं.
एकंदर काय तर अंतरपाट हे कापड फक्त एक विधी राहिला नाही तर कुटुंबाचे आशीर्वाद कायमचे जपण्याचा एक मार्ग बनला आहे. अंतरपाटाला परंपरेचा, श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि प्रेमाचा स्पर्श आहे. तुम्हाला अंतरपाटाचं हे महत्त्व माहिती होतं का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
