सुखा पाटील कोण आहे?
सुखा पाटील यांचं खरं नाव सुखदेव क्षीरसागर पाटील आहे. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील घरनिकी गावचे रहिवासी आहेत. सध्या मात्र ते गादेगाव भागात त्यांच्या मुलीच्या घरात राहतात आणि अजूनही शेती करतात. त्याचं वय साधारण 85 वर्ष असल्याचं म्हटलं जातंय. त्यांचं आयुष्य साधं असलं तरी त्यांच्या खाण्यापिण्याच्या आणि कष्टाच्या गोष्टींमुळे मात्र ते लोकांच्या चर्चेत आले.
advertisement
व्हायरल होण्यामागचं कारण
"बंदा रुपया" नावाच्या यूट्यूब चॅनेलने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ अपलोड केला. या चॅनेलवर गावाकडच्या लोकांच्या गोष्टी, जुन्या आठवणी, आणि त्यांच्या जीवनशैलीवर संवाद केले जातात. या चॅनेलवर सांगोला तालुक्यातील बजीरंग कोळी यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी जुन्या काळातील खाण्यापिण्याबद्दल विचारलं असता त्यांनी "सुखा पाटील" यांचं नाव घेतलं. त्यांनी सांगितलं, "सुखा पाटील सकाळीच 35 भाकऱ्या खायचे, हजार कडब्याच्या पेंढ्या बांधायचे, पाणी प्यायचेच नाही, फक्त दूध प्यायचे, एका विहिरीतलं पाणी एकट्याने काढायचे." हे ऐकल्यानंतर लोकांना उत्सुकता वाटली आणि "हा सुखा पाटील नेमका कोण?" असा प्रश्न सर्वत्र पसरला.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुखा पाटील यांचीही मुलाखत घेण्यात आली. तेव्हा त्यांनी सांगितलं, "मी विहिरीतून पाणी काढायला जायचो, त्याआधी 6-7 भाकऱ्या खायचो. कालवण खायचो, दूध पित होतो. दिवसाला जवळपास 4 लिटर दूध जिरत होतं. मेंढरं राखायचो, शेतात कष्टाची कामं करायचो. तेव्हा अंगात ताकद होती आणि कामाशिवाय दिवस सरायचा नाही."
एक हृदयद्रावक किस्सा
सुखा पाटील यांच्या आयुष्यात एक काळोखी घटना देखील घडली आहे. त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला झाला होता आणि त्यात त्यांचा एक डोळा निकामी झाला. तरीसुद्धा आजही ते शेतीचं काम करतायत आणि गावात साधं आयुष्य जगतायत.
लोकांमध्ये चर्चेचं कारण
आजच्या तरुणांना 35 भाकरी खाणं, विहिरीचं पाणी एकट्यानं काढणं अशक्य वाटतं. पण जुन्या काळात शारीरिक कष्ट इतके जास्त असायचे की ताकदीसाठी आणि जगण्यासाठी भरपूर अन्न आणि दूध लागत असे. सुखा पाटील हे त्याचं उत्तम उदाहरण आहेत.