मिळालेल्या माहितीनुसार, कॅरोलिन क्रे असं या महिलेचं नाव असून ती अमेरिकेतील मॅसेच्युसेट्समधील रहिवासी आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, तिला एक दुर्मिळ आजार आहे. त्यामुळे तिला जवळजवळ प्रत्येक गोष्टीची अॅलर्जी आहे. भात, भाकरी किंवा मोहरी यांसारखे सामान्य पदार्थ खाल्ल्यानेही तिचा जीव जाऊ शकतो. साउथ वेस्ट न्यूज सर्व्हिसशी बोलताना 24 वर्षांच्या कॅरोलिनने तिच्या विचित्र आजाराबद्दल माहिती दिली. ती म्हणाली, "सध्या मी फक्त एलीकेअर (बेबी फॉर्म्युलाचा ब्रँड) आणि दलिया खाऊ शकते."
advertisement
कॅरोलीनला कोणता आजार?
अमेरिकन अॅकॅडमी ऑफ अस्थमा, अॅलर्जी आणि इम्युनॉलॉजीच्या मते, कॅरोलीनला मास्ट सेल अॅक्टिव्हेशन सिंड्रोम (एमलीएएस) हा आजार आहे. हा एक दुर्मिळ इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला वारंवार अॅलर्जीची गंभीर लक्षणं जाणवतात. अॅलर्जी ट्रिगर करणाऱ्या घटकांची यादी फारच मोठी असते. या यादीमध्ये तांदूळ, ब्रेड, मासे, शेंगदाणे, तीळ, किवी, मोहरी, बुरशी, मांजर आणि कुत्र्याची फर यांचा समावेश आहे. वरील खाद्यपदार्थ खाल्ल्याने रुग्णामध्ये अॅनाफिलेक्टिक शॉक नावाची घातक अॅलर्जीक रिअॅक्शन निर्माण होऊ शकते.
कॅरोलिनला सप्टेंबर 2017 मध्ये या आजाराबद्दल पहिल्यांदा कळलं होतं. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ती अॅनाफिलेक्टिक शॉकमध्ये गेली होती. तिला 12 तास रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच महिन्यात पिझ्झा, ब्रेड, भात आणि बीन्स खाल्ल्याने तिला अनेकवेळा अॅनाफिलेक्टिक शॉकचा सामना करावा लागला. अनेक तपासण्या केल्यानंतर तिला समजलं की, ती गंभीर आजाराने ग्रस्त आहे आणि तिला जवळजवळ सर्व गोष्टींची अॅलर्जी आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या आजारामुळे कॅरोलिनला अनेक खाद्यपदार्थ टाळावे लागत आहेत. दिवसातून तीन वेळच्या जेवणात दलिया आणि अमीनो-आधारित बेबी फॉर्म्युला खाण्यावाचून तिच्याकडे दुसरा पर्याय नाही.