Shravan Somvar: श्रावण सोमवारचं उद्यापन घरच्या-घरी असं करतात; पहा विधी, नियम, साहित्यांची यादी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shravan Somvar Vrat Udyapan Vidhi: श्रावण महिन्यातील सर्व सोमवारचे व्रत पूर्ण झाल्यावर किंवा काही लोकांनी सोळा सोमवारचे व्रत केले असल्यास, शेवटच्या सोमवारनंतर येणाऱ्या योग्य तिथीला उद्यापन करण्याची परंपरा आहे. उद्यापन केल्याशिवाय व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
मुंबई : श्रावण मासारंभ लवकरच होत आहे. श्रावणात शंकराची पूजा करून सोमवारी व्रत-उपवास केला जातो. श्रावण सोमवार व्रताचे उद्यापन करणे हे व्रताची सांगता करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. श्रावण महिन्यातील सर्व सोमवारचे व्रत पूर्ण झाल्यावर किंवा काही लोकांनी सोळा सोमवारचे व्रत केले असल्यास, शेवटच्या सोमवारनंतर येणाऱ्या योग्य तिथीला उद्यापन करण्याची परंपरा आहे. उद्यापन केल्याशिवाय व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
श्रावण सोमवार व्रताचे उद्यापन कधी करावे?
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी उद्यापन करावे. ज्यांनी सोळा सोमवारचे व्रत केले आहे, त्यांनी १७ व्या सोमवारी उद्यापन करावे. पण, जर विशिष्ट सोमवारी उद्यापन करणे शक्य नसेल, तर पुढे कोणत्याही महिन्यातील सोमवारी उद्यापन करता येते. उद्यापनाच्या दिवशीही व्रताचे नियम पाळावे लागतात. शक्य असल्यास, या दिवशी उपवास ठेवावाच.
advertisement
उद्यापनाची तयारी अशी करा:
उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ (शक्यतो पांढरे किंवा हलक्या रंगाचे) कपडे परिधान करावे. पूजा करण्याच्या जागेवर गंगाजल शिंपडून ती जागा शुद्ध करून घ्यावी. शक्य असल्यास पूजेच्या ठिकाणी केळीच्या पानांचे चार खांब लावून एक छोटासा मंडप तयार करावा. तो फुलांनी आणि आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजवावा.
advertisement
पूजा सामग्री : भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती किंवा फोटो, चंद्रदेवाची मूर्ती/चित्र (जर १६ सोमवार व्रत असेल), आसन, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर), बेलपत्र, धतुरा, भांग, चंदन, कुंकू, अक्षता, सुपारी, पान, लवंग, वेलदोडे, फुलं, हार, धूप, दीप, वस्त्र, जानवं, नैवेद्य (शिरा, खीर किंवा गोड पदार्थ), दक्षिणा, आणि ऋतूनुसार फळे इत्यादी पूजा सामग्री जवळ ठेवावी.
advertisement
पूर्व दिशेला तोंड करून स्वच्छ आसनावर बसावे. मंडपाच्या मध्यभागी लाकडी पाटावर (चौकीवर) पांढरे वस्त्र अंथरून त्यावर भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती/फोटो स्थापित करावा. चंद्राचे चित्र किंवा प्रतीकही ठेवावे (जर १६ सोमवार व्रत असेल). सर्वप्रथम भगवान शंकरांना आणि माता पार्वतीला गंगाजलाने अभिषेक करावा. त्यानंतर पंचामृताने (दूध, दही, तूप, मध, साखर) अभिषेक करून पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. भगवान शंकरांना चंदन, माता पार्वतीला कुंकू लावावे. धूप-दीप लावावे आणि फुले, फळे, पान, सुपारी, जानवं अर्पण करावे. बेलपत्र, धतुरा आणि भांग भगवान शंकराला अर्पण करावे. तयार केलेला नैवेद्य भगवान शिव आणि माता पार्वतीला अर्पण करावा. श्रावण सोमवार व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी आणि त्यानंतर भगवान शिव-पार्वतीची आरती करावी. त्यानंतर केलेल्या व्रताची सांगता करण्याचा संकल्प सोडावा आणि आपली मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल भगवान शंकराचे आभार मानावेत. भविष्यातही त्यांची कृपा कायम राहावी, अशी प्रार्थना करावी.
advertisement
उद्यापनानंतर एखाद्या ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला (शक्य असल्यास शिव-पार्वतीची पूजा करणारा ब्राह्मण-ब्राह्मणीची जोडी) भोजन घालावे. भोजन झाल्यावर त्यांना दक्षिणा द्यावी. वस्त्र, धान्य किंवा इतर उपयोगी वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. तयार केलेल्या नैवेद्याचे तीन भाग करावेत. एक भाग देवाला अर्पण करावा, दुसरा भाग ब्राह्मण किंवा गायीला द्यावा, आणि तिसरा भाग स्वतः आणि कुटुंबातील लोकांनी भोजन म्हणून ग्रहण करावा. दानधर्म आणि पूजा झाल्यावर उपवास सोडावा. रात्री जमीनवर झोपावे. श्रावण सोमवार व्रताचे उद्यापन पूर्ण भक्तीने आणि नियमानुसार केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 17, 2025 12:08 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan Somvar: श्रावण सोमवारचं उद्यापन घरच्या-घरी असं करतात; पहा विधी, नियम, साहित्यांची यादी