SEBC, OBC विद्यार्थ्यांना शेवटची संधी! जात प्रमाणपत्राबाबत CET Cell चा मोठा निर्णय
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Cast Validity: सीईटी कक्षाने ओबीसी आणि एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलीये.
मुंबई: शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (एसईबीसी) आणि मागास प्रवर्गातून (ओबीसी) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलीये. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आता 6 एप्रिल 2025 पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आलीये.
सीईटी कक्षामार्फत 2024-25 या शैक्षणिक वर्षात राबविलेल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेश घेताना अनेक विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची पावती सादर केली होती. या पावतीच्या आधारावर महाविद्यालयांत विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती.
advertisement
काही विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले. अनेकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे शक्य झालेले नाही. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून सीईटी कक्षाने 6 एप्रिल 2025 पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा दिली आहे. अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही अशा विद्यार्थ्यांनी संबंधित जात पडताळणी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि दिलेल्या मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून ते ऑनलाइन सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर अपलोड करावे.
advertisement
विद्यार्थ्यांनी संबंधित संस्था किंवा महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र जमा करावे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र संस्थेत किंवा महाविद्यालयात जमा केले आहे, त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करण्यात आले आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी, अशा सूचना सीईटी कक्षाकडून करण्यात आल्या आहेत.
2025-26 प्रवेशासाठी सूचना
2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठीच ही सवलत आहे. 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी एसईबीसी आणि ओबीसी संवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असेही सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 08, 2025 9:47 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
SEBC, OBC विद्यार्थ्यांना शेवटची संधी! जात प्रमाणपत्राबाबत CET Cell चा मोठा निर्णय


