NMMS Scholarship: विद्यार्थ्यांना दरमहा 1 हजार रुपये मिळणार, जाणून घ्या कुठे आणि कसा करायचा अर्ज?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
NMMS Scholarship: केंद्र सरकारमार्फत विद्यार्थ्यांसाठी खास शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येतेय. आता दर महिन्याला विद्यार्थ्यांना 1 हजार रुपये मिळणार आहेत.
पुणे : राज्य शिक्षण परीक्षा मंडळामार्फत राष्ट्रीय साधन-सह-गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना (NMMS) अंतर्गत इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी,तसेच त्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेता यावे यासाठी ही परीक्षा घेतली जाते.या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक 12 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणारी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्ती योजना (NMMS) ही इयत्ता आठवीत शिकणाऱ्या गुणवंत तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी महत्वाची योजना आहे. या परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 1,000 रुपये म्हणजेच वार्षिक 12 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या शिष्यवृत्तीसाठी इयत्ता नववीपासून बारावीपर्यंत विद्यार्थी पात्र असतात.
advertisement
आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठीच संधी
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्ती योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनाच मिळतो. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा जास्तीत जास्त 3 लाख 50 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.ही अट पूर्ण करणारे आणि परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थीच दरवर्षी 12 हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात.
परीक्षा देता येते, लाभ मात्र नाही
विनाअनुदानित, केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालये, सैनिक शाळा, शासकीय वसतिगृहात राहणारे विद्यार्थी, खासगी निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते. मात्र, त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही.
advertisement
अर्ज कुठे करायचा?
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज प्रक्रिया राज्य शिक्षण परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. www.mscepune.in आणि www.mscenmms.in या संकेतस्थळांवरून अर्ज भरता येतो. मात्र अर्ज प्रक्रिया थेट शाळांमार्फत केली जाते, त्यामुळे विद्यार्थी स्वतः ऑनलाइन अर्ज करू शकत नाहीत.
पात्रतेसाठी काय आहेत अटी-शर्ती ?
विद्यार्थी इयत्ता आठवीमध्ये राज्य सरकार, सरकारी अनुदानित किंवा स्थानिक संस्थांच्या शाळेत शिकत असावा. तसेच त्याला सातवीमध्ये किमान 55 टक्के गुण मिळालेले असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुणांची किमान मर्यादा 50 टक्के ठेवण्यात आली आहे.
advertisement
एनएमएमएस परीक्षा मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, तेलगू आणि कन्नड या सात भाषांत घेतली जाते. 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठीची परीक्षा 21 डिसेंबर रोजी होणार असून निकाल फेब्रुवारी महिन्यात जाहीर केला जाणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 19, 2025 1:48 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
NMMS Scholarship: विद्यार्थ्यांना दरमहा 1 हजार रुपये मिळणार, जाणून घ्या कुठे आणि कसा करायचा अर्ज?