MPSC परीक्षेत तृतीयपंथी उमेदवारांसाठी नवे नियम, पाहा कशी असेल शारीरिक चाचणी?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तृतीय पंथीयांसाठी शारीरिक मानके निश्चित केली आहेत. त्यामुळे आता त्यांना स्पर्धा परीक्षेतून चांगलं पद मिळवण्याचा मार्ग मोकळा झालाय.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे: राज्यातील तृतीय पंथीयांच्या पोलीस भरतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तृतीय पंथीयांसाठी शारीरिक मानके निश्चित केली आहेत. मात्र ज्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस भरतीसाठी परीक्षा दिल्या त्यांचे निकाल राखून ठेवल्याची बाब उघडकीस आलीय. त्यातच शारीरिक चाचणीसाठीच्या नव्या नियमांवर पुण्यातील तृतीयपंथी उमेदवारांनी नाराजी व्यक्त केलीय.
पोलीस भरतीत अडचणी
पिंपरी चिंचवड मधील निकिता मुख्यदल ही तृतीयपंथी महिला कधीकाळी नितीन मुख्यदल होती. तिने आपलं लिंग बदल करून महिला होण्याचा निर्णय घेतला. तोच नितीन आज निकिता झाला. लिंग निवडण्याच्या अधिकाराची लढाई निकिताने जिंकली. मात्र समाजात तृतीपंथीयांची होणारी उपेक्षा लक्षात आल्यानंतर तिने स्वतः ला सिद्ध करण्याचे ठरवले. थेट पोलीस दलात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जीवतोड मेहनत करून 2022 मध्ये झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. मात्र पोलिस होऊ इच्छिणाऱ्या तृतीय पंथीयांसाठीचे शारीरिक निकष निश्चित नसल्याने निकिता भरती प्रक्रिया पूर्ण करू शकली नाही.
advertisement
वीणाचा निकाल ठेवला राखून
निकिता प्रमाणेच समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी अनेकजणी अहोरात्र मेहनत करतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा देणारी वीणा काशीद ही आधी विनायक काशीद होती. तृतीय पंथीयांमध्ये आज राज्यातील सर्वाधिक उच्च शिक्षित असलेल्या वीणाने पोलिस होऊन आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्याचं ठरवलं. त्यासाठी मॅट अर्थात महाराष्ट्र प्रशासन न्यायाधिकरण मार्फत न्यायालयीन लढा जिंकून पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक पद राखीव देखील करून घेतलं, मात्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून देखील मागील दोन वर्षांपासून तिचा देखील निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे वीणाने प्रशासकीय यंत्रणेच्या हेतुवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त केलाय.
advertisement
तृतीय पंथीयांसाठी शारीरिक मानांकन निश्चित
तृतीयपंथी पुरुष असलेल्यांसाठी
1) गोळा फेक वजन - 7.260 कि. ग्रॅ. गुण - 15
2) पुल अप्स कमाल गुण - 20
3) लांब उडी कमाल गुण - 15
4) धावणे 800 मीटर कमाल गुण - 50
advertisement
तृतीयपंथी महिला असलेले
1) गोळा फेकवजन - 4 कि. ग्रॅ. गुण - कमाल गुण - 20
2) धावणे ( 400 मीटर ) कमाल गुण - 50
3) लांब उडी कमाल गुण - 30
पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होऊन ज्या तृतीपंथीयांना पोलीस उप निरीक्षक व्हायचं आहे त्यांना शारिरीक चाचणीचे हे निकष पूर्ण करावे लागणार आहेत. मात्र दुसरीकडे ज्या तृतीपंथीयांना पोलीस शिपाई पदासाठी तयारी करायची आहे त्यांना सामान्य स्त्री पुरुषांची शारीरिक मानके पार करावी लागणार आहेत. त्यामुळे तृतीयपंथीयांना हा त्यांच्यावर होणारा अन्याय वाटतोय. अशा परिस्थितीत, आगामी काळात होणाऱ्या पोलिस भरती प्रक्रियेत तरी राज्य सरकार पोलिस बनू पाहणाऱ्या तृतीयपंथियाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सकारात्मक पाऊलं उचलेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
April 15, 2024 3:19 PM IST

