UPSC Success Story : दहावीनंतर 11 वर्षांनी 12वी पास; 42 व्या वर्षी UPSCमध्ये शेवटची रँक
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
सध्या महेश कुमार यांच्या संघर्षमय प्रवासाची खूपच चर्चा सुरू असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा प्रवास प्रेरणादायी असाच आहे.
दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी मार्फत दरवर्षी आयएएस, आयपीएस, आयएफएस यासह भारतातील नागरी सेवांमधील विविध महत्त्वाच्या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते. यूपीएससीनं नुकताच नागरी सेवा परीक्षा 2023 चा निकाल जाहीर केलाय. यामध्ये आदित्य श्रीवास्तव याने प्रथम क्रमांक तर अनिमेष प्रधान आणि डोनुरु अनन्या रेड्डी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलाय. या परीक्षेत एकूण 1 हजार 16 उमेदवार उत्तीर्ण झालेत. पण तुम्हाला माहिती आहे का, या परीक्षेत सर्वात शेवटची रँक म्हणजेच 1 हजार 16 वा क्रमांक मिळवणाऱ्या उमेदवाराचा यूपीएससी उत्तीर्ण करेपर्यंतचा प्रवास खूपच संघर्षमय आहे.
बिहार राज्यातील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील रहिवासी असणारे दिव्यांग उमेदवार महेश कुमार (वय 42) यांनी यूपीएससी 2023 परीक्षेत 1 हजार 16 वी रँक मिळवली आहे. ते सध्या शेखपुरा जिल्हा न्यायालयात लिपिक म्हणून काम करतात. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘बिहार लोकसेवा आयोगानं अर्थात बीपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या दोन परीक्षांमध्ये मला यश आले नव्हते. मी 2013 मध्ये टीईटी उत्तीर्ण झालो, व माझी नोकरीसाठी नियुक्ती झाली. त्यानंतर 2018 मध्ये मला कोर्टात नोकरी लागली. 2024 मध्ये बीपीएससीद्वारे आयोजित शिक्षक भरती स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर माझी उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून निवड झाली. आता यूपीएससी परीक्षेमध्येही मला यश मिळाले आहे.’
advertisement
महेश यांना यूपीएससी परीक्षेच्या इंटरव्ह्यूमध्ये मुझफ्फरपूरच्या प्रसिद्ध लिचीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. याशिवाय, गांधींचे बिहारमध्ये आगमन, आंदोलनाची सुरुवात, बिहार पूर्वी समृद्ध असायचा पण आज मागास का, असे प्रश्नही त्यांना विचारण्यात आले होते.
आर्थिक अडचणींचा करावा लागला सामना
महेश कुमार हे 1995 मध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत स्कूल टॉपर होते. मात्र आर्थिक अडचणींमुळे त्यांनी शिक्षणात गॅप घेतला होता. तब्बल 11 वर्षांनंतर त्यांनी बारावीला प्रवेश घेतला. 2008 मध्ये ते परीक्षा देऊ शकले. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. याबाबत कुमार यांनी सांगितलं की, ‘मी स्वतः यूपीएससीची तयारी करून ही परीक्षा उत्तीर्ण केली. नोकरी करताना वेळ मिळाल्यावर अभ्यास करायचो. न्यायालयात जाण्यापूर्वी दोन तास अभ्यास करायचो. स्वतः स्वयंपाक करून खात होतो. याआधी बीपीएससीच्या दोन परीक्षेत इंटरव्ह्यूपर्यंत गेलो होतो. पण दोन मार्क्स कमी पडल्यानं यश मिळाले नाही. सुरुवातीला खूप आर्थिक संकट आली. त्यामुळे मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर 11 वर्षांनी मी इंटरमिजिएटचा अभ्यास सुरू केला. नोकरी लागल्यानंतर आर्थिक अडचण संपली.’
advertisement
वडील विकत होते डाळ-तांदूळ
view commentsमहेश कुमार यांचे वडील बाजारात डाळ-तांदूळ विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. महेश यांना सात भाऊ-बहिणी असल्यानं त्यांच्या वडिलांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे फार कठीण होते. मात्र परिस्थितीनं हिंमत न हारता महेश यांनी संघर्ष सुरू ठेवत यश मिळवलं आहे. याबाबत महेश यांचे वडील महेंद्र शाह यांनी सांगितलं की, ‘मी बाजारात डाळ आणि तांदूळ विकायचो. पण आज मुलगा अधिकारी झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला आनंद झाला आहे.’
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 20, 2024 11:09 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
UPSC Success Story : दहावीनंतर 11 वर्षांनी 12वी पास; 42 व्या वर्षी UPSCमध्ये शेवटची रँक


