पाण्यावरून वाद, 9 वर्षाच्या भावालाच संपवलं अन्...., बीडमधील ‘त्या’ प्रकरणात मोठं अपडेट
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Beed News: शेती शेजारी असून पाणी देण्यासाठी वापरली जाणारी पाइपलाइन सामायिक होती. याच कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वारंवार वाद होत असत.
बीड: शेतातील पाणीपुरवठ्याच्या वादातून 9 वर्षांच्या चुलत भावाचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आला होता. आता या प्रकरणात मुख्य आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी सायंकाळी हा निकाल दिला. या प्रकरणात पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याबद्दल अन्य तिघांना तीन वर्षांची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
परळी तालुक्यातील चांदापूर गावात अनिकेत गित्ते आणि अतुल गित्ते यांची शेती शेजारी असून पाणी देण्यासाठी वापरली जाणारी पाइपलाइन सामायिक होती. याच कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वारंवार वाद होत असत. 15 डिसेंबर 2018 रोजी हा वाद टोकाला गेला. आरोपी अतुल गित्ते याने कट रचत आपल्या चुलत भावाचा सुती दोरीने गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घरातील पाण्याच्या हौदात उभा करून ठेवण्यात आला होता.
advertisement
या घटनेनंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सखोल तपास करून दोषारोपपत्र अंबाजोगाई येथील सत्र न्यायालयात सादर केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता बाळासाहेब लोमटे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या प्रकरणात एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले असून फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच वैद्यकीय तज्ज्ञांची साक्ष अत्यंत निर्णायक ठरली.
advertisement
सरकारी पक्षाचा युक्तिवाद मान्य करत जिल्हा व सत्र न्यायाधीश रचना रमेशसिंह तेहरा यांनी मुख्य आरोपी अतुल गित्ते याला भारतीय दंड संहिता कलम 302 (खून) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत दोषी ठरवले. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावत 15 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
याशिवाय, गुन्ह्यानंतर पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याप्रकरणी रवी वैजनाथ गित्ते (24), वैजनाथ रंगनाथ गित्ते (50) आणि आशाबाई वैजनाथ गित्ते (45) या तिघांना प्रत्येकी तीन वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी अभियोक्त्यांना ॲड. शिवाजी व्यंकटराव मुंडे यांनी सहकार्य केले, तर तपास व कोर्ट पैरवीसाठी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 10:33 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पाण्यावरून वाद, 9 वर्षाच्या भावालाच संपवलं अन्...., बीडमधील ‘त्या’ प्रकरणात मोठं अपडेट








