स्कॉर्पिओमधून आले अन् कोयत्याने केले वार, कराडच्या ईदगाह मैदानावर रक्तरंजित राडा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Karad: सातारा जिल्ह्यातील कराडच्या ईदगाह मैदानावर गप्पा मारत बसलेल्या एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
विशाल पाटील, प्रतिनिधी सातारा: सातारा जिल्ह्यातील कराड इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ईदगाह मैदानावर गप्पा मारत बसलेल्या एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. स्कॉर्पिओमधून आलेल्या पाच जणांनी लाथा बुक्क्यांसह चाकू आणि कोयत्याने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात संबंधित युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करत सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
शुभम कट्टीमनी असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. घटनेच्या दिवशी २९ तारखेला तो कराडच्या ईदगाह मैदानात आपल्या काही मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. सायंकाळी साडेसातच्या सुमारास तिथे पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून पाच जण आले. त्यांनी गाडीतून उतरताच शिवीगाळ करत शुभमवर हल्ला चढवला. आरोपींनी चाकू आणि कोयत्याने वार केले. तसेच काही जणांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
advertisement
यामध्ये शुभम कट्टीमनी हा युवक जखमी झाला. या हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या शुभमच्या मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
आरोपींनी शुभमला मारहाण करताना जीवे ठार करण्याची देखील धमकी दिली आहे. यामुळे पोलिसांनी आरोपींवर खूनाच्या प्रयत्नासह जीवे मारण्याची धमकी, आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात एक अल्पवयीन मुलासह पाच जणांचा समावेश आहे. कराड शहर पोलीस या प्रकरणात पाचही आरोपींना अटक केली आहे. ईदगाह मैदानात अशाप्रकारे एका तरुणावर हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
March 31, 2025 7:54 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
स्कॉर्पिओमधून आले अन् कोयत्याने केले वार, कराडच्या ईदगाह मैदानावर रक्तरंजित राडा