भोंदूबाबांनी साधला डाव! 'वाईट स्वप्न दूर करतो', म्हणत वृद्ध दाम्पत्याचं लुटलं 17 तोळं सोनं
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
नागपूरच्या वाठोडा येथे दोन भोंदूबाबांनी जगदीश जामगडे (60, शेतकरी) आणि त्यांच्या पत्नीला फसविले. त्यांच्या मृत मुलाचा आणि दुसऱ्या मुलाच्या व्यसनाचा उल्लेख करत...
नागपूर : दोन भोंदूबाबांनी एका वृद्ध दाम्पत्याच्या भावनिक अडचणींचा गैरफायदा घेतला आहे. वाईट स्वप्न दूर करण्याच्या आणि घरातील अडचणी संपवण्याच्या नावाखाली, त्यांनी तब्बल 17 तोळे सोन्याचे आणि 50 ग्रॅम चांदीचे दागिने घेऊन पळ काढला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा फसवणुकीचा धक्कादायक प्रकार घडला असून, आरोपींनी दाम्पत्याच्या मृत मुलाचा संदर्भ देत त्यांच्यावर विश्वास बसवला आणि नंतर फसवणुकीचे जाळे विणले.
मृत मुलाचा आधार घेत विश्वास जिंकला!
जगदीश परसराम जामगडे (वय-60, रा. बिडगाव) हे शेतकरी आहेत. दुर्दैवाने, त्यांच्या एका मुलाचे निधन झाले आहे. 18 जुलै रोजी तथाकथित इंद्रपाल भोवर (रा. पारशिवनी) नावाचा एक व्यक्ती जामगडे यांच्या घराबाहेर उभा असताना तिथे पोहोचला. त्याने आपण भविष्य पाहू शकतो अशी बतावणी केली आणि जामगडे यांना त्यांच्या मृत मुलाबद्दल काही अचूक गोष्टी सांगितल्या. त्यानंतर त्याने त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या व्यसनाबद्दलदेखील काही बाबी सांगितल्या.
advertisement
यामुळे जामगडे यांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि त्यांनी त्याला घरात बोलावले. जामगडे यांनी इंद्रपाल भोयरला सांगितले की, त्यांच्या पत्नीला वाईट स्वप्न येत आहेत आणि त्यामुळे त्यांना झोप येत नाहीये. यावर आरोपीने उपाय करून हे दोष दूर होतील असे सांगितले आणि आपला मोबाईल क्रमांक दिला. यानंतर तो जामगडे दाम्पत्याच्या संपर्कात होता.
advertisement
पूजेच्या नावाखाली दागिने लंपास!
20 जुलै रोजी रात्री 12 वाजता इंद्रपाल भोयर हा विलास भोवर ऊर्फ उज्जैनने महाराज याच्यासोबत जामगडे यांच्या घरी पोहोचला. दोन्ही आरोपींनी जामगडे यांच्या पत्नीला सांगितले की, तिला येणारी वाईट स्वप्ने घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांमुळे येत आहेत. त्यावर उपाय करण्यासाठी घरात असलेले सर्व दागिने आणायला सांगितले.
जामगडे दांपत्याने घरातील सर्व सोन्या-चांदीचे दागिने आणून आरोपींसमोर ठेवले. आरोपींनी ते दागिने देवांसमोर ठेवून 'अगरबत्ती' लावण्यास आणि प्रार्थना करायला सांगितले. जामगडे दाम्पत्य प्रार्थना करत असताना, रात्री दोन वाजता आरोपींनी संधी साधली. त्यांनी 17 तोळे सोन्याचे दागिने आणि 50 ग्रॅम चांदीचे दागिने हातात घेतले. जामगडे दांपत्याला भुरळ पाडून, आरोपींनी ते दागिने लगेच बाहेर जाऊन घरात आणून ठेवतो असे सांगितले आणि तिथून निघून गेले.
advertisement
मात्र, ते परतलेच नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, जामगडे यांनी त्यांना फोन करत दागिने परत करण्याची विनंती केली. परंतु, आरोपींनी टाळाटाळ केली आणि त्यानंतर आपला फोनच स्वीच ऑफ केला. अखेर, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, जगदीश जामगडे यांनी वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.
advertisement
हे ही वाचा : Amravati News: नवऱ्याचं बाहेर लफडं, तरीही 'ती'ला दमदाटी; म्हणे, "चुपचाप संसार कर, नाहीतर..."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 04, 2025 2:31 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
भोंदूबाबांनी साधला डाव! 'वाईट स्वप्न दूर करतो', म्हणत वृद्ध दाम्पत्याचं लुटलं 17 तोळं सोनं






