Crime News : डॉक्टरसोबत 4.40 कोटींचा फ्रॉड, मनी लॉन्ड्रिंगची धमकी देऊन खाली केलं अकाऊंट
- Published by:Shreyas
- trending desk
Last Updated:
सध्याच्या काळात सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. सायबर गुन्हेगारांनी बिहारमधल्या एका प्रसिद्ध डॉक्टरला साडेचार कोटी रुपयांना गंडा घातला.
मुंबई : सध्याच्या काळात सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. सायबर गुन्हेगारांनी बिहारमधल्या एका प्रसिद्ध डॉक्टरला साडेचार कोटी रुपयांना गंडा घातला. विशेष म्हणजे गुन्हेगारांनी सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून डॉक्टरकडून पैसे वसूल केले. सायबर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी एफआयआर नोंदवला असून, तपास सुरू आहे. बिहारमधल्या गयामध्ये सायबर गुन्हेगारीचं एक मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. शहरातल्या प्रसिद्ध डॉक्टरला जाळ्यात ओढून गुन्हेगारांनी त्याला 4.40 कोटी रुपयांना गंडा घातला आहे. सायबर गुन्हेगारांनी सीबीआयचे अधिकारी असल्याचं सांगून डॉक्टरला मनी लाँडरिंगच्या खोट्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून त्याच्याकडून पैसे वसूल केले. ही रक्कम डॉक्टरच्या बँक खात्यातून सहा दिवसांत (31 जुलै ते 5 ऑगस्टदरम्यान) गुन्हेगारांनी वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली. याबाबत सायबर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.
सायबर पोलीस स्टेशनच्या प्रमुख साक्षी राय यांनी सांगितलं, की 'या प्रकरणी एफआयआर नोंदवून पुढची कारवाई केली जात आहे. सायबर गुन्हेगारांनी ज्या खात्यांमध्ये रक्कम ट्रान्स्फर केली होती, त्या 123 बँक खात्यांबाबत माहिती मिळाली आहे. त्याचा तपास सुरू आहे. संबंधित बँकांकडून खात्यांची केवायसी मिळवली जात आहे. आतापर्यंत त्या खात्यांमध्ये जमा असलेले सुमारे 61 लाख रुपये गोठवले आहेत.'
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, एका सायबर गुन्हेगाराने 29 जुलै रोजी डॉक्टरला त्यांच्या मोबाइलवर कॉल करून स्वतः सीबीआय ऑफिसर असल्याचं सांगितलं. तसंच तुमच्याविरुद्ध सीबीआयने फौजदारी केस दाखल केल्याचं सांगितलं. डॉक्टरच्या नावाने मुंबईत एचडीएफसी बँकेत खातं उघडलं गेलं आहे. त्यात मनी लाँडरिंगची रक्कम आणि बेकायदा रक्कम जमा होत आहे. जर तुम्हाला फौजदारी कार्यवाहीपासून वाचायचं असेल तर सायबर न्यायालयाने तुमच्या बँक खात्यात जमा असलेली रक्कम तात्काळ दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करण्यास सांगितलं आहे, असं डॉक्टरला सांगितलं.
advertisement
त्यानंतर डॉक्टरला काही बँक खात्यांची संख्या आणि त्याची माहिती पाठवण्यात आली. जर तुम्ही असं नाही केलं तर तुमच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी होईल आणि तुम्हाला अटक होईल, असं सायबर गुन्हेगारांनी डॉक्टरला सांगितलं. याशिवाय तीन कोटी रुपयांची सुरक्षा रक्कम जमा करण्यासदेखील सांगितलं. दहशतीच्या सावटाखाली असलेल्या डॉक्टरने 31 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या बँक खात्यात रक्कम ट्रान्स्फर केली.
advertisement
पोलिसांना दिलेल्या जबाबात पीडित डॉक्टरने सांगितलं, की जेव्हा गुन्हेगारांनी सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी केली तेव्हा मी घाबरलो आणि पैसे ट्रान्स्फर केले; मात्र फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. डॉक्टरने 6 ऑगस्टला एफआयआर नोंदवला. या प्रकरणी गयाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आशीष भारती यांनी तपासासाठी एसपी (शहर) प्रेरणा कुमार यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केली. पोलिसांनी कलम 319(2)/318(4) बीएनएस आणि 66 (सी)/66 (डी) आयटी कायद्यान्वये एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Location :
Gaya,Bihar
First Published :
Aug 23, 2024 11:38 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : डॉक्टरसोबत 4.40 कोटींचा फ्रॉड, मनी लॉन्ड्रिंगची धमकी देऊन खाली केलं अकाऊंट







