advertisement

dawood ibrahim : कोकणात जन्मलेल्या दाऊदने किती लग्नं केली, किती आहे मुलं आणि ती सद्धा काय करताय?

Last Updated:

Dawood Ibrahim : महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात दाऊद इब्राहिम कासकरचा जन्म झाला. त्याचे वडील इब्राहिम कासकर हे पोलीस हवालदार होते. त्याचं कुटुंब मुंबईतील डोंगरी भागात स्थायिक झालं.

(दाऊद इब्राहिम)
(दाऊद इब्राहिम)
मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गेल्या 30 वर्षांपासून पाकिस्तानात लपून बसला आहे. कराचीमध्ये बसून तो जगभरात आपला अवैध धंदा चालवत आहे. भारतीय भारतीय तपास यंत्रणांनी दाऊदचे कॉल डिटेल्सही काढले आहेत. त्यामुळे तो पाकिस्तानमध्येच असल्याचं सिद्ध झालं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय तपास यंत्रणांच्या डोळ्यात सलत असलेला दाऊद सध्या आपल्या जीवनाच्या शेवटच्या घटका मोजत असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
कोण आहे दाऊद इब्राहिम?
26 डिसेंबर 1955 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात दाऊद इब्राहिम कासकरचा जन्म झाला. त्याचे वडील इब्राहिम कासकर हे पोलीस हवालदार होते. त्याचं कुटुंब मुंबईतील डोंगरी भागात स्थायिक झालं. 70च्या दशकात मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये दाऊदने आपली दहशत निर्माण केली होती. पूर्वी तो हाजी मस्तान गँगमध्ये काम करायचा. पुढे त्याचा प्रभाव वाढत गेला. लोक त्याच्या टोळीला 'डी-कंपनी' म्हणायचे. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या सीरिअल बॉम्बस्फोटांचा तो मास्टरमाईंड होता. स्फोट घडवून आणल्यानंतर तो भारत सोडून दुबईला पळून गेला आणि नंतर पाकिस्तानात आपला तळ ठोकला. सध्या तो आपल्या कुटुंबासह तिथे राहतो. त्याच्यावर भारतात दहशतवादी हल्ला, खून, अपहरण, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, संघटित गुन्हेगारी, ड्रग्ज, शस्त्रास्त्रांची तस्करी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2003 मध्ये त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे. 2011 मध्ये, एफबीआय आणि फोर्ब्सच्या यादीत त्याला जगातील तिसरा सर्वात वाँटेड फरार गुन्हेगार म्हटलं होतं.
advertisement
भारताचा शत्रू नंबर वन असलेला दाऊद हा 1993 मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील मुख्य आरोपी आहे. अमेरिकेनेही त्याला दहशतवादी घोषित केलं आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दाऊदचा ठावठिकाणा शोधण्यात तसेच त्याचा आवाज रेकॉर्ड करण्यात यश मिळवलं आहे. गुप्तचर यंत्रणा त्याच्या पाकिस्तानमधील ठिकाणांपर्यंत पोहचल्या आहेत. पण, त्याला ताब्यात घेण्यात यश मिळालं नाही.
advertisement
कराचीत दोन ठिकाणी दाऊदचं बस्तान
कराचीतील क्लिफ्टन रोडवर असलेला 'व्हाईट हाउस बंगला' हे दाऊदचं पाकिस्तानातील कायमचं निवासस्थान आहे. तो आपल्या संपूर्ण कुटुंबासह तिथे राहतो. या शिवाय कराचीमध्येच डिफेन्स हाउसिंग कॉलनीमध्ये त्याचा एक बंगला (बंगला क्रमांक-37) आहे. नवीन खुलाशानुसार, दाऊद आता कराचीतील डिफेन्स एरियातील अब्दुल्ला गाझी बाबा दर्ग्याच्या मागे रहिम फाकीजवळ राहतो. ज्या रस्त्यावर त्याचा बंगला आहे तो कराचीतील नो-ट्रेसपास झोन आहे आणि तिथे पाकिस्तानी रेंजर्सचा कडक पहारा आहे. दाऊदला आयएसआयकडून संरक्षण मिळत आहे. दाऊदशी संबंधित सर्व पुरावे पाकिस्तानला देण्यात आल्याचं भारत सरकारचं म्हणणं आहे. पण, हे पुरावे खोटे असल्याचा सूर पाकिस्तान सातत्याने लावत आहे. दाऊद पाकिस्तानात नाही, असा पाकिस्तानचा दावा होता. नंतर पाकिस्तानने दाऊदचं कराचीतील वास्तव्य मान्य केलं. मात्र, कारवाईच्या नावाखाली संपूर्ण जगाची दिशाभूल केली जात आहे.
advertisement
कुटुंबासह करतो दुबाई वारी
दाऊदकडे एकूण 14 पासपोर्ट असल्याचा दावा भारतीय तपास यंत्रणांनी केला आहे. दाऊद आपली पत्नी आणि चार मुलांसह कराचीमध्ये राहतो. तो वारंवार दुबईला जात असल्याचं कागदपत्रांवरून स्पष्ट झालं आहे. गुप्तचर यंत्रणांना दाऊद इब्राहिमची पत्नी झुबिना झरिन उर्फ मेहजबीन हिच्या नावे टेलिफोन बिल आणि दाऊदचे अनेक पासपोर्टही सापडले आहेत. काही माध्यम संस्थाकडे भारताना दाऊदविरुद्ध तयार केलेल्या गुन्हेगारी रेकॉर्ड फाइलची (डॉसियर) प्रत देखील आहे. एनएसए स्तरावरील चर्चेत हे डॉसियर पाकिस्तानकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. यामध्ये दाऊदच्या नऊ ठिकाणांचा उल्लेख आहे. ही सर्व ठिकाणं पाकिस्तानमधील आहेत. यातील बहुतांश पत्ते कराचीतील आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्येही दाऊदची मालमत्ता आहे.
advertisement
पाकिस्तानी मुलीशी केलं लग्न
दाऊदने पाकिस्तानी पठाण मुलीशी दुसरं लग्न केलं आहे. दाऊदची पहिली पत्नी मेहजबीन हिनेही याला दुजोरा दिला होता. दाऊदची पहिली पत्नी मेहजबीन प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे भारतातील नातेवाईकांच्या संपर्कात असते. मेहजबीन ही मुंबईची आहे. मेहजबीन आणि दाऊदचा घटस्फोट झालेला नाही. त्याने तिच्या संमतीने दुसरं लग्न केल्याचं म्हटलं जातं.
advertisement
दाऊद आणि मेहजबीन यांना चार अपत्य आहेत. माहरुख इब्राहिम, महरिन इब्राहिम, मारिया इब्राहिम अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत तर मोईन इब्राहिम नवाझ हे त्याच्या मुलाचं नाव आहे. दाऊदची मोठी मुलगी माहरुख इब्राहिम हिचा आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियाँदादचा मुलगा जुनैद यांचा निकाह (2014 मध्ये) झाला आहे. दाऊदची दुसरी मुलगी महरिन हिचा निकाह पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन व्यावसायिक अयुब याच्याशी झाला. सर्वात धाटकी मुलगी मारिया 1998 मध्ये मरण पावली. मुलाने सोनिया नावाच्या मुलीशी लग्न केलं आहे. दाऊदला सात भावंड आहेत. यामध्ये हसीना पारकर, सईदा पारकर, फरजाना तुंगेकर आणि मुमताज शेख या बहिणींचाही समावेश आहे. अनीस इब्राहिम, नूरा इब्राहिम आणि इक्बाल अशी त्याच्या भावांची नावं आहेत.
advertisement
पत्नी मेहजबीन सांभाळते गुन्हेगारी साम्राज्य
मुंबई बॉम्बस्फोटानंतर अनीस इब्राहिम आणि नूरा इब्राहिम हे दोन भाऊ दाऊदसोबत दुबईला पळून गेले होते. 2007 मध्ये कराची बॉम्बस्फोटात नूराचा मृत्यू झाला. अनीस दाऊदसोबत राहतो. तिसरा भाऊ इक्बाल कुटुंबासह मुंबईत राहतो. हसीना पारकर आणि सईदा या दोन बहिणी मुंबईत राहत होत्या. मात्र, आता दोघींचाही मृत्यू झाला आहे. फरजाना तुंगेकर हिचा देखील मृत्यू झाला आहे. दाऊदची पत्नी मेहजबीन आपला दीर अनीससोबत मिळून दाऊदचं गुन्हेगारी साम्राज्य सांभाळत असल्याचं माध्यमांनी म्हटलं आहे.
दाऊदचं गुन्हेगारी साम्राज्य
- दाऊद इब्राहिमवर 1993मधील मुंबई बॉम्बस्फोटांव्यतिरिक्त, 26/11चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला घडवून आणणं, बंदी घातलेली दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन आणि अयमान अल-जवाहिरी यांच्याशी जवळचे संबंध, 2G स्पेक्ट्रम घोटाळा आणि आयपीएल स्पॉट फिक्सिंगचे आरोप आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आयएस आणि अल-कायदा प्रतिबंध समितीने दाऊदला जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे.
- संयुक्त राष्ट्रांच्या यादीत दाऊद इब्राहिमच्या 15 उपनावांची नोंद आहे - दाऊद इब्राहिम, शेख दाऊद हसन, अब्दुल हमिद अब्दुल अजीज, अनीस इब्राहिम, अजीज दिलीप, दाऊद हसन शेख इब्राहिम कासकर, दाऊद इब्राहिम मेमन कासकर, दाऊद हसन इब्राहिम कासकर, दाऊद इब्राहिम मेमन, दाऊद साबरी, कासकर दाऊद हसन, शेख मोहम्मद इस्माइल अब्दुल रहमान, दाऊद हसन शेख इब्राहिम, शेख इस्माइल अब्दुल आणि हिजरत इत्यादी नावांचा यामध्ये समावेश आहे.
- एस. हुसेन झैदी यांनी लिहिलेल्या 'डोंगरी ते दुबई' या पुस्तकातही दाऊदची वेगवेगळी नावं असल्याचा दावा करण्यात आला आहे. सुरुवातीच्या काळात तो 'मुच्छड' या नावाने ओळखला जात होता. मात्र, भारतातून पळून गेल्यानंतर तो सतत आपली नावं आणि ओळख बदलत राहिला. असे म्हटलं जातं की, आपला लूक बदलण्यासाठी त्यानं चेहऱ्यावर अनेक वेळा शस्त्रक्रियाही केल्या आहेत. पाकिस्तानात स्थायिक झाल्यावरही त्यानं नाव बदललं. शेख दाऊद हसन हे नाव त्याची पाकिस्तानातील ओळख आहे. या शिवाय काही लोक डेव्हिड किंवा भाऊ असंही म्हणतात.
- भारतातील लोकांना हाजी साहेब किंवा अमीर साहेब या नावानं फोन करतो. पाकिस्तानातील त्याच्या ठिकाणांबाबतची माहिती भारताकडे आहे. भारत सरकारने पाकिस्तानला सोपवलेल्या डॉसियरमध्ये त्याच्या सर्व ठिकाणांचा उल्लेख आहे.
- युरोप, आफ्रिका आणि दक्षिण आशियामधील डझनहून अधिक देशांमध्ये त्याचा व्यवसाय आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, ब्रिटन, जर्मनी, तुर्की, फ्रान्स, स्पेन, मोरोक्को, सायप्रस, यूएई, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर या देशांचा समावेश आहे. ब्रिटनमध्ये त्याच्याकडे 450 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती आहे. विविध देशांमध्ये 50 हून अधिक मालमत्तांमध्ये त्याने गुंतवणूक केलेली आहे.
- सरकारने कडक नजर ठेवूनही दाऊदचं भारतातील अवैध धंद्यांतून मिळणारं उत्पन्न पूर्णपणे थांबलेलं नाही. काही अहवालांनुसार, त्याच्या कमाईतील 40 टक्के रक्कम अजूनही भारतातून मिळते. बनावट भारतीय चलनी नोटा (FICN) हा त्याचा भारतातील मुख्य व्यवसाय आहे. मात्र, मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे त्याच्या व्यवसायाला मोठा फटका बसल्याचं बोललं जातं.
- त्याचा दक्षिण आफ्रिकेत हिऱ्यांचा अवैध व्यवसाय आहे. दक्षिण आफ्रिकेतून काढलेले बहुतेक हिरे कटिंग आणि पॉलिश करण्यासाठी भारतात येतात. त्याचा जवळचा सहकारी छोटा शकील याने दुबईतील आपला व्यवसाय बंद केल्याची चर्चा आहे.
- छोटा शकील भारतात दाऊदचं गुन्हेगारी सिंडिकेट चालवतो आणि तो भारतात या कामासाठी कॉन्ट्रॅक्ट किलर भरती करणारी व्यक्ती असल्याचं असल्याचं म्हटलं जातं. दाऊदचा आणखी एक विश्वासू साथीदार छोटा शकीलला मदत करतो. त्याला दक्षिण आफ्रिकेत रहमत म्हणून ओळखलं जाते. फोर्ब्सच्या 2015 मधील अंदाजानुसार, दाऊदची एकूण संपत्ती 6.7 अब्ज डॉलर्स आहे. यानुसार दाऊद इब्राहिम हा आतापर्यंतच्या सर्वात श्रीमंत गँगस्टर्सपैकी एक आहे.
बॉलिवूडमध्येही दाऊदने अनेक चित्रपटांना अर्थ पुरवठा केल्याचे आरोप अनेकदा झाले आहेत. बॉलिवूडमधील सिनेमांच्या कथांवरही या गँगस्टरचा मोठा प्रभाव आहे. 'ब्लॅक फ्रायडे' (9 फेब्रुवारी, 2007), 'शूटआउट अॅट वडाळा' (1 मे, 2013), 'कंपनी' (15 एप्रिल, 2002), 'डी' (3 जून, 2005), 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' (30 जुलै 2010), 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई अगेन' (15 ऑगस्ट 2013), 'शूटआउट अॅट लोखंडवाला' (25 मे, 2007), 'डी डे' (19 जुलै, 2013) यांसारख्या अंडरवर्ल्डवर आधारित चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्यांनी दाऊदची व्यक्तिरेखा साकारलेली आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
dawood ibrahim : कोकणात जन्मलेल्या दाऊदने किती लग्नं केली, किती आहे मुलं आणि ती सद्धा काय करताय?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement