रात्री अचानक हॉटेलमध्ये घुसले 3 मारेकरी, दोघांवर सपासप वार, प्रेम प्रकरणातून मोठा कांड
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Hingoli: हिंगोलीतील हयातनगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं तीन जणांनी हॉटेलमध्ये घुसून दोघांवर जीवघेणा हल्ला केला आहे.
हिंगोलीतील हयातनगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं तीन जणांनी दोघांवर जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपींनी धारदार चाकूने वार करत दोघांना रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर हत्येसह जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सुरू आहे.
विशाल मुंजाजी देवरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील थोरावा गावातील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी मंगळवारी रात्री तो ओंकार नरवाडे नावाच्या एका मित्रासोबत तो हयातनगर पाटीजवळील एका हॉटेलमध्ये बसला होता. या वेळी थोरावा येथीलच संशयित गोपाळ देवरे, ऋषिकेश कदम, शिवाजी देवरे हे तिघे हॉटेलमध्ये घुसले.
advertisement
तिघांनी विशाल आणि ओंकार यांच्यावर चाकूने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दोघेही प्रतिकार करू शकले नाही. या घटनेत विशालच्या पोटावर व छातीवर वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर ओमकार याच्याही पोटावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. हल्ला केल्यानंतर तिन्ही संशयित आरोपी पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांना तातडीने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी विशालचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. तर गंभीर जखमी असलेल्या ओंकारला नांदेडला उपचारासाठी हलवलं. मृत विशाल हा वसमत येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याचं एका मुलीवर प्रेम होतं. याच कारणातून त्याच्यावर हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे. तिन्ही आरोपी सध्या फरार आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत.
Location :
Hingoli,Maharashtra
First Published :
June 26, 2025 7:11 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
रात्री अचानक हॉटेलमध्ये घुसले 3 मारेकरी, दोघांवर सपासप वार, प्रेम प्रकरणातून मोठा कांड