काँग्रेस नेत्याच्या 23 वर्षीय मुलीची हत्या, 'लव्ह जिहाद'च्या आरोपांमुळे राजकारण तापलं
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांनी ही हत्या लव्ह जिहाद असल्याचं म्हटलंय. निरंजन हिरेमठ यांनी म्हटलं की, मी मागणी करतो की इतर लोकांना सुद्धा या प्रकरणामध्ये अटक व्हावी.
बेळगाव : कर्नाटकात हुबळी धारवाड महापालिकेचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिची तिच्याच क्लासमध्ये शिकणाऱ्या फयाज नावाच्या मुलाने चाकूने भोसकून हत्या केली. या हत्या प्रकरणानंतर नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांनी ही हत्या लव्ह जिहाद असल्याचं म्हटलंय. निरंजन हिरेमठ यांनी म्हटलं की, मी मागणी करतो की इतर लोकांना सुद्धा या प्रकरणामध्ये अटक व्हावी. हे लव्ह जिहाद नाही तर काय आहे? लव्ह जिहादसाठी ते चांगल्या घरातील मुलींना टार्गेट करता. त्यांचा एन्काउंटर करायला पाहिजे किंवा फाशी द्यायला हवी.
निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. कॉलेज परिसरातच तिच्यावर कॉलेज ड्रॉपआउट स्टुडंट फय्याज खोंडुनाईक याने चाकू हल्ला केला. पोटासह शरीरावर चाकूने 7 वार करण्यात आले. यात तिचा मृत्यू झाला. नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांनी केलेल्या आरोपानंतर भाजपनेसुद्धा लव्ह जिहादवरून आरोप केला.
काँग्रेसचं धोरण जिहादींना पोषक - भाजप
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आरोप केला की, काँग्रेस सरकारचे जिहादींना पोषक वातावरण तयार करणारे धोरण आहे. हुबळी कॉलेजमध्ये नेहाची हत्या ही बिघडलेल्या सुरक्षा व्यवस्थेचं उदाहरण आहे. आरोपींना अटक करणं पुरेसं नसून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलायला हवीत.
advertisement
हा लव्ह जिहाद नाही - सिद्धरामय्या
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा प्रकार लव्ह जिहाद नसल्याचं म्हटलंय. लव्ह जिहादचं हे प्रकरण नाही. मी या घटनेचा निषेध करतो. तसंच आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. आम्ही गुन्हेगाराला कठोर शिक्षा देऊ. कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी प्रयत्न केले जातील.
काय घडलं होतं?
नेहा आणि फयाज यांची कॉलेजमध्ये ओळख झाली होती. फयाजने नेहाला प्रपोज केलं पण नेहाने ते स्वीकारलं नव्हतं. त्यानंतर नापास झालेला फयाज सहा महिन्यांपासून कॉलेजला आला नव्हता. मात्र नेहाने नकार दिल्याच्या रागातून त्याने कॉलेज परिसरात तिचा पाठलाग करून हल्ला केला. या हल्ल्यात नेहा गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना कॉलेज परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 20, 2024 3:36 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
काँग्रेस नेत्याच्या 23 वर्षीय मुलीची हत्या, 'लव्ह जिहाद'च्या आरोपांमुळे राजकारण तापलं