'मी आणि अश्विनी परस्पर संमतीने...', लग्नाच्या 27 वर्षांनी अभिजीत पानसेंची 'मोठी' अनाऊंसमेन्ट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Abhijit Panse Post : मराठी इंडस्ट्रीत काही सेलिब्रेटींचे डिवोर्स झाले. अशातच अभिनेते, दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजीत पानसे यांची पोस्ट चर्चेत आली आहे.
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात मागच्या काही दिवसात काही कलाकारांनी डिवोर्स घेतल्याची माहिती समोर आली. गायक अभिनेता राहुल देशपांडेनं लग्नाच्या 17 वर्षांनी डिवोर्स घेतला. त्यानंतर 'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्तेनं देखील लग्नाच्या 5 वर्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या दोन कलाकारांच्या डिवोर्सची चर्चा सुरू असताना आता 'रेगे' फेम दिग्दर्शक, अभिनेते आणि मनसे नेते अभिजीत पानसे यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे.
अभिजीत पानसे यांनी पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिलंय, "तुम्ही प्रत्येकाने तुमच्या वेगळ्या मार्गानं माझ्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. म्हणूनच मला माझ्या आयुष्यातला एक वैयक्तिक आणि महत्त्वाचा अपडेट तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तुमच्यापैकी काहींना मी ही बातमी आधीच सांगितली आहे."
advertisement
"27 वर्षांच्या संसारानंतर आणि असंख्य सुंदर आठवणींनंतर, अश्विनी आणि मी एकत्र राहण्याचा आणि आमचं आयुष्य पुढं नेत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आमचं कायदेशीर लग्न फेब्रुवारी 1998 मध्ये परस्पर संमतीने संपन्न झालं."

त्यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिलंय, "ही बदलाची वेळ नीट समजून घेण्यासाठी आणि खासगीपणे स्वीकारण्यासाठी मी थोडा वेळ घेतला. विशेषत: आमच्या मुलींच्या हिताचा विचार करून सर्व काही नीट पार पडावं, हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं. त्या माझं सर्वोच्च प्राधान्य आहेत आणि मी अश्विनीसोबत मिळून त्यांचं संगोपन, प्रेम, आधार आणि स्थैर्य कायम ठेवण्याचं वचन देतो. आमच्यासाठी हा एक नवा अध्याय आहे, पण पालक म्हणून आमचं नातं आणि एकमेकांबद्दलचा आदर नेहमीच मजबूत राहील."
advertisement
अभिजीत पानसे यांनी पोस्टमध्ये शेवटी लिहिलंय, "या काळात आमच्या गोपनीयतेचा आणि निर्णयाचा आदर कराल, याबद्दल मी मनापासून आभारी आहे. प्रेम आणि कृतज्ञतेसह – अभिजीत"
अभिजीत पानसे यांनी सध्या सुरू असलेल्या डिवोर्स ट्रेंडवर उपहात्मक पोस्ट लिहिली आहे. "हल्ली सगळंच सोशल मीडियावर शेअर करण्याची पद्धत आहे, म्हणून मीही", असं त्यांनी पोस्टच्या शेवटी लिहिलंय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2025 11:50 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मी आणि अश्विनी परस्पर संमतीने...', लग्नाच्या 27 वर्षांनी अभिजीत पानसेंची 'मोठी' अनाऊंसमेन्ट