Subodh Bhave: सुबोध भावेंचा आणखी एक बायोपिक, नीम करोली बाबाच्या भूमिकेत दिसणार, पहिला लूक समोर
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Subodh Bhave: मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका क्षेत्रातील एक आघाडीचे आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे, अभिनेता सुबोध भावे. मराठीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं.
मुंबई : मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका क्षेत्रातील एक आघाडीचे आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे, अभिनेता सुबोध भावे. मराठीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. अशातच आता ते हिंदी सिनेमांकडे वळाल्याचं पाहायला मिळतंय. नुकतंच त्यांनी त्यांच्या आगामी सिनेमाचं पोस्टर शेअर केलंय. ज्यामध्ये ते बाबाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
मराठीत ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य : एक युगपुरुष’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ अशा सिनेमांतून त्यांनी ऐतिहासिक आणि थोर व्यक्तिमत्त्वे जिवंत केली आहेत. आता ते आणखी एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
सुबोध भावे लवकरच नीम करोली बाबा यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं नाव ‘श्री बाबा नीब करोरी महाराज’ असं ठेवण्यात आलं आहे. नुकतंच लखनऊ येथे या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं.
advertisement
सुबोध भावेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं, “बाबा नीम करोली महाराज यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात त्यांची भूमिका साकारण्याचे भाग्य मला लाभलं. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येईल. जय श्रीराम! जय हनुमान!” पोस्टरमध्ये सुबोध भावे पूर्णपणे नीम करोली बाबा यांच्या वेशात दिसतात. छोटे केस, साधी दाढी, कपाळावर टिळा आणि घोंगडी घेऊन बसलेले. त्यांच्या या लूकमुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
advertisement
advertisement
दरम्यान, नीम करोली बाबा हे गेल्या शतकातील सर्वात प्रभावशाली संतांपैकी एक मानले जातात. उत्तराखंडमधील कैंची धाम हे त्यांचं प्रमुख आश्रम असून आजही लाखो भाविक तेथे दर्शनासाठी जातात. बाबांनी त्यांच्या आयुष्यात जवळपास 108 हनुमान मंदिरे बांधली. ते साधेपणाने राहिले आणि लोकांमध्ये अध्यात्माचा संदेश दिला. हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसुद्धा बाबा नीम करोलींचे भक्त आहेत. आता त्यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा सुबोध भावेच्या अभिनयातून रसिकांसमोर कसा साकारतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2025 6:40 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Subodh Bhave: सुबोध भावेंचा आणखी एक बायोपिक, नीम करोली बाबाच्या भूमिकेत दिसणार, पहिला लूक समोर