मध्यांतरानंतर पडदाच उघडेना, विशाखा सुभेदारच्या नाटकात वेगळंच 'नाटक'; कलाकारांवर आली पडदा सरकवण्याची वेळ
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या नाटकावेळी एक वेगळंच 'नाटक' सुरू झालं. मध्यांतरानंतर मंचावरचा पडदाच उघडत नव्हता.
नाट्यगृह आणि तिथल्या सोयीसुविधा यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केली जातात. आजही महाराष्ट्रातील अनेक नाट्यगृहांची दयनीय अवस्था आहे. पण नुकताच अंबरनाथ येथील नाट्यगृहात असा काही प्रकार घडला की पाहून सगळे अवाक् झाले. पाच महिन्यांआधी सुरू झालेल्या या नव्या कोऱ्या नाट्यगृहात भयंकर तांत्रिक बिघाड झाला आणि कलाकारांबरोबरच प्रेक्षकांनाही मनस्ताप सहन करावा लागला.
अंबरनाथ येथील धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिरात नुकत्याच पार पडलेल्या 'दमयंती दामले' या नाट्यप्रयोगादरम्यान एक अनपेक्षित प्रकार घडला. रंगमंचावरच वेगळंच 'नाटक' सुरू झालं होतं. मध्यंतरानंतर नाट्यगृहाचा पडदाच उघडत नव्हता. कलाकारांना स्वतः हाताने पडदा सरकवत प्रयोग सुरू करावा लागला. या नाट्यप्रयोगात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना स्वतः पुढे येत पडदा उघडावा लागला. तांत्रिक अडचणी असूनही शो मस्ट गो ऑन म्हणत कलाकारांनी प्रसंगावधान राखत नाटक सुरू ठेवले.
advertisement
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेले हे नाट्यमंदिर अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच सुरू झाले आहे. मात्र इतक्या कमी कालावधीतच येथे तांत्रिक अडचणी समोर येऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फक्त पडदाच नव्हे तर या प्रयोगादरम्यान साऊंड सिस्टीममध्येही बिघाड झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे या नाट्यगृहाच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
advertisement
advertisement
हे नाट्यमंदिर शहराच्या पश्चिम भागातील स्टेशन परिसरातील सर्कस मैदान येथे उभारण्यात आले आहे. तब्बल 22 हजार चौरस फूट क्षेत्रफळावर उभ्या असलेल्या या भव्य नाट्यगृहात 633 आसन व्यवस्था आहे. तसेच 90 चारचाकी आणि 250 दुचाकी वाहनांसाठी पार्किंग, अल्पोहारगृह, कॉन्फरन्स हॉल, व्हीआयपी रूम आणि बाल्कनीसारख्या सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 19 ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत या नाट्यमंदिराचे लोकार्पण करण्यात आलं होतं.
advertisement
यासंदर्भात मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी प्राथमिक माहिती देताना सांगितले की, "नाट्यप्रयोगाच्या वेळी नाट्यगृह संबंधित संस्थेच्या ताब्यात दिले जाते. पडद्याच्या लॉकचं बटण चुकून दाबलं गेल्यामुळे पडदा उघडला नाही. अन्य कोणताही मोठा तांत्रिक बिघाड नव्हता. तरीही याबाबत सविस्तर माहिती घेतली जाईल."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 5:04 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मध्यांतरानंतर पडदाच उघडेना, विशाखा सुभेदारच्या नाटकात वेगळंच 'नाटक'; कलाकारांवर आली पडदा सरकवण्याची वेळ








