Kalyan News : सलग 3 दिवस शाळा बंद? पाण्यामुळे कल्याणमध्ये एवढा मोठा गोंधळ कसा झाला?
Last Updated:
kalyan City : कल्याण पश्चिमेतील बैलबाजार परिसरात मेट्रो कामादरम्यान जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा कोलमडला आहे. या अडथळ्यामुळे के. सी. गांधी शाळा सलग तीन दिवस बंद ठेवावी लागली असून विद्यार्थ्यांच्या अभ्यास, परीक्षा आणि कार्यक्रमांवर मोठा परिणाम झाला आहे.
कल्याण : कल्याण पश्चिमेतील बैलबाजार परिसरात मंगळवारी केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान ही जलवाहिनी फुटली असल्याने कल्याण पश्चिमेमध्ये पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातही जलवाहिनी दुरुस्तीसाठी बैलबाजार ते गुरुदेव हॉटेलकडे जाणारा मुख्य रस्ता बंद ठेवण्यात आला असून त्यामुळे वाहतूक कोंडीही वाढली आहे.
या शाळेला बसला फटका?
या रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्याचा मोठा फटका के. सी. गांधी शाळेला बसला आहे. या मार्गावरच शाळा असल्याने विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या शालेय बसेसना रस्ता उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. परिणामी शाळा प्रशासनाला मागील बुधवारपासून सलग तीन दिवस शाळा बंद ठेवावी लागली. शाळेत सध्या जवळपास 3 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून रस्ता बंद असल्याने त्यांचा शाळेत येण्याजाण्याचा पूर्ण मार्ग ठप्प झाला आहे.
advertisement
शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास मागे पडत आहे. शिवाय सध्या परीक्षा सुरू होण्याचा काळ असल्याने अनेक तयारीचे तास वाया जात आहेत. त्याचबरोबर विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजनही शाळेत सुरू होते. मात्र तीन दिवस शाळा बंद राहिल्याने या उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांवरही परिणाम होत आहे.
याबाबत शाळेच्या संचालिका स्वप्नाली रानडे यांनी सांगितले की, रस्ता एकतर्फी बंद राहिल्याने शाळेच्या वाहतुकीची संपूर्ण व्यवस्था कोलमडली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आणि केडीएमसी प्रशासनाने पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही शाळा प्रशासनाने केली आहे.
advertisement
जलवाहिनी दुरुस्तीसाठीचे काम सुरू असून रस्ता लवकर खुला झाला तरच शालेय वाहतूक सुरळीत होईल. तोपर्यंत शेकडो पालक आणि हजारो विद्यार्थ्यांची डोकेदुखी मात्र कायम राहणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 06, 2025 12:43 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News : सलग 3 दिवस शाळा बंद? पाण्यामुळे कल्याणमध्ये एवढा मोठा गोंधळ कसा झाला?







