Video: मेकअप आर्टिस्ट व्हायचंय? जाणून घ्या खास कोर्स आणि टिप्स
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
सध्या मेकअप इंडस्ट्रीत करियरची मोठी संधी आहे. मेकअप आर्टिस्ट कोण होऊ शकतं? पाहा खास टिप्स
पुणे, 22 ऑगस्ट: गेल्या 5 ते 6 वर्षांपासून भारतात स्टायलिंग आणि मेकअपची चलती बघून अनेक आंतरराष्ट्रीय सलून कंपन्या येथे शाखा उघडू लागल्या आहेत. या स्टायलिंग आणि मेकअपच्या अभ्यासक्रमात व्यक्तिमत्व फुलवण्याचे कौशल्यतंत्र समाविष्ट असल्याने या तज्ज्ञांची मागणी उत्तरोत्तर वाढत चालली आहे. त्यात शिक्षणाची जास्त कुठलीही अट नसल्याने महिला देखील या क्षेत्राकडे वळत आहेत. मेकअप अभ्यासक्रमाविषयी पुण्यातील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट ऋतुजा आल्हाट यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत.
मेकअप इंडस्ट्रीत कुणाला संधी?
मेकअपचे अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण दहावी किंवा बारावी उत्तीर्ण कोणत्याही उमेदवारास घेता येते. तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत किती टक्के गुण मिळाले यापेक्षा तुमच्या सर्जनशीलतेची टक्केवारी किती? ते महत्त्वाचे असते. या प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये मेकअपचे विविध प्रकार, पारंपरिक, आधुनिक अथवा समकालीन पध्दती हे विषय शिकवले जातात. हा अभ्यासक्रम करणाऱ्या व्यक्तींना स्टायलिंगचे प्रशिक्षण मिळतं, असे मेकअप आर्टिस्ट ऋतुजा सांगतात.
advertisement
स्टायलिस्ट होण्याची संधी
या शिक्षणामुळं सेलिब्रिटी स्टायलिंग पासून कॉर्पोरेट्समधील उच्चपदस्थ व्यक्तिंचे स्टायलिंग करू शकतात. चित्रपट, टीव्ही, क्रीडापटू, कॉर्पोरेट बॉसेस, उ्द्योजक, उच्चपदस्थांचे कुटुंबीय, शेकडो मालिकांधील हजारो पात्रे, असंख्य रिॲलिटी शोमधील शेकडो स्पर्धक आणि परीक्षक आदींसाठी स्टायलिस्ट्सची गरज मोठी आहे. त्यामुळे या क्षेत्रात हिंमतीने आणि हिकमतीने शिरल्यास चांगल्या उत्पन्नासह लोकांच्या गळ्यातील ताईत बनता येणे शक्य आहे, असं मेकअप आर्टिस्ट ऋतुजा सांगतात.
advertisement
मेकअपच्या अभ्यासक्रमाविषयी..
या स्टायलिंग आणि मेकअप तज्ज्ञांची मागणी उत्तरोत्तर वाढत चालली आहे. वेगवेगळ्या अकॅडमींनी ब्रायडल मेकअप, ओकेजन मेकअप, फॅन्टसी मेकअप, हाय डेफिनेशन मेकअप, अल्टिमेट एअर ब्रश मेकअप असे ॲडव्हान्स्ड अभ्यासक्रम सुरु केले आहेत. शिवाय डे ॲण्ड नाईट मेकअप, पार्टी मेकअप, एंगेजमेंट मेकअप, ओकेजन मेकअप, कॉर्पोरेट मेकअप, एव्हरी डे मेकअप असे मुलभूत अभ्यासक्रम सुरु केले आहेत. अनेक ब्युटी मेकअप ट्रेनिंग आणि एज्युकेशन अकादमींमधून मूलभूत आणि प्रगत अभ्यासक्रम घेऊन प्रमाणपत्रे मिळवता येतात. यामुळे तुम्हाला स्वत:चा स्टार्टअप सुरु करुन तुमची ओळख सिद्ध करता येईल. यासाठी सरकारकडून कौशल्य विकास योजनेंतर्गत असे अभ्यासक्रमही चालवले जात आहेत.
advertisement
चांगला करियर पर्याय
मेकअप आर्टिस्ट्री हा क्रिएटिव्ह फिल्डमधील चांगला करिअर पर्याय आहे. मेकअप शिक्षण आता अनेक लोकांसाठी करिअरचा मार्ग बनला आहे. यासोबतच ब्युटी इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. परंतु काही वेळा या क्षेत्रात सर्रास फसवणूक होताना देखील दिसून येत आहे. भरमसाठ पैसे आकारून देखील काहींना योग्य पद्धतीने शिकवलं जात नाही. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या मेकअप ॲकॅडेमीमध्ये प्रवेश घेत असाल तर त्याविषयी सुरुवातीला माहिती जाणून घेणं गरजेचं असल्याचं देखील आल्हाट यांनी सांगितलं.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 22, 2023 1:32 PM IST