Karela for Diabetes: कारलं खाल्ल्याने डायबिटीस खरंच नियंत्रणात येतो? काय आहे आहारतज्ज्ञांचं मत
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Health benefits of Karela in Marathi: कारलं हे चवीला कडू असतं. त्यामुळे त्यात असलेले लेक्टिन हे इन्सुलिनसारखं काम करतं आणि रक्तातली साखर कमी करतं. याशिवाय कारल्यात असेलल्या अनेक पोषकतत्त्वांमुळे कारलं खाल्ल्याने आरोग्याला विविध फायदे होतात.
मुंबई : बदलती जीवनशैली, तणातणाव आणि धकाधकीच्या आयुष्यामुळे अनेकांना हृदयविकार,डायबिटीसचा सामना करावा लागतो. वाढतं वजन नियंत्रणात ठेवणं हे जितकं कठीण आहे, तितकंच डायबिटीसला नियंत्रणात ठेवणं कठीण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या आहारात विविध निर्बंध लादून घ्यावे लागतात. डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी अनेक जण अनेक पर्यांयाचा वापर करतात. उदा. जांभळाचा रस पिणं, कारल्याचा रस पिणं, आहारात कारल्याचा वापर करणं. ज्यांना कारलं आवडत नाही अशा व्यक्ती कारलं तळून खातात. मात्र असं केल्याने खरचं रक्तातली साखर कमी होतो का ? कारलं कडू आहे म्हणून सारखेचं प्रमाण कमी होतं की खरोखरच कारलं खाल्ल्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात राहते जाणून घेऊयात या प्रश्नांची उत्तरं.
आहारतज्ज्ञ काय सांगतात?
विविध आहारतज्ज्ञांच्या मते डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी कारलं खाणं हे फायद्याचं मानलं जातं. कारलं हे चवीला कडू असतं. त्यामुळे त्यात असलेले लेक्टिन हे इन्सुलिनसारखं काम करतं आणि रक्तातली साखर कमी करतं. कारलं खाल्ल्यामुळे रक्तातली साखर कमी होत असली तरीही मनाला वाटेल तितके गोड पदार्थ खाऊन साखर कमी करण्यासाठी फक्त कारलं खाणं हे हिताचं नाही. त्यामुळे आरोग्याला कोणतेही फायदे होणार नाहीत. किंवा फक्त आणि फक्त डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी कारलं खाणं हे सुद्धा फायद्याचं नाही. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहार, शांत झोप आणि तणावविरहीत आयुष्य जगण्याची गरज आहे. अन्यथा कितीही कारलं खाल्लं तरीही रक्तातली साखर कमी होणार नाही. कारण रक्तातली साखर वाढण्यासाठी फक्त गोड पदार्थ हेच एकमेव कारण ठरत नाही.
advertisement

कारलं खाण्याने फक्त रक्तातली साखर कमी होऊन डायबिटीस नियंत्रणातच येत नाही. तर कारल्यात असेलल्या अनेक पोषकतत्त्वांमुळे कारलं खाल्ल्याने आरोग्याला विविध फायदे होतात. कारल्यात फायबर, व्हिटॅमिन ए आणि सी चांगल्या प्रमाणात आढळून येतात. फायबर्समुळे अन्न पचायला मदत होते. व्हिटॅमिन हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. तर व्हिटॅमिन सी मुळे त्वचेच्या आरोग्यात सुधारणा होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. त्यामुळे नियमितपणे कारल्याचं सेवन केल्याने एकूणच आरोग्याला फायदे होतात. कारल्यात असलेल्या पॉलिफेनॉल अँटिऑक्सिडंट्समुळे शरीराची जळजळ कमी होऊन ऑक्सिडेटिव्ह तणावापासून शरीराचं रक्षण होतं. कारल्याचं नियमित सेवन हे यकृताच्या आरोग्यासाठी फायद्याचं मानलं जातं. त्यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास असणाऱ्यांनी कारलं खाणं हे फायद्याचं ठरतं. मात्र ब्लड प्रेशर, डायबिटीस, फॅटी लिव्हर हे गंभीर स्वरूपाचे आजार असल्यामुळे कारल्याचा थेट वापर करण्याऐवजी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
'ही' चूक टाळा
कारलं हे चवीला कडू असल्याने अनेक जण ते तळून खाणं पसंद करतात. असं म्हटलं जातं की, कारलं तळल्याने त्याचा कडवटपणा कमी होतो. मात्र याच कडवटपणासोबत कारल्याचे औषधी गुणधर्मही नष्ट होतात. तळल्यामुळे कारल्यातली पोषक तत्त्वं निघून गेल्याने कारलं फक्त एक भाजी उरतं. त्यामुळे ज्यांना वजन कमी करण्यासाठी कारलं खायचं आहे त्यांनी कारलं तळून खाण्याची चूक कधीही करू नये.
advertisement
कारलं हे रक्तातली साखर कमी करण्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. मात्र ते औषधांना पर्याय ठरू शकणार नाही. याशिवाय आधी सांगितल्याप्रमाणे डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी तणावमुक्त राहाणं आणि पोषक, सकस आहार घेणं तितकंच फायद्याचं ठरतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 19, 2025 7:35 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Karela for Diabetes: कारलं खाल्ल्याने डायबिटीस खरंच नियंत्रणात येतो? काय आहे आहारतज्ज्ञांचं मत