मिसळप्रेमी कोल्हापुरात थालीपीठ खायला गर्दी, महिला विकतेय तब्बल 13 प्रकार
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
कोल्हापुरात एकाच ठिकाणी तब्बल 13 प्रकारचे थालीपीठ मिळते. एका महिलेने सुरू केलेलल्या थालीपीठ हाऊस येथे खवय्यांची नेहमी गर्दी असते.
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : थालीपीठ हा एक पौष्टिक, चविष्ट आणि चमचमीत पदार्थ आहे. बऱ्याच जणांना थालीपीठ खायला आवडते. अशाच खवय्यांसाठी कोल्हापुरात तब्बल 13 प्रकारचे थालीपीठ मिळणारं एक प्रसिद्ध ठिकाण आहे. एका महिलेने हा थालीपीठाचा व्यवसाय कष्टाने मोठा केला आहे. त्यामुळे काहीतरी खायला बाहेर पडल्यावर बऱ्याच जणांच्या लिस्टमध्ये थालीपीठ हाऊस हे ठिकाण हमखास असते.
advertisement
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ ते शाहू टोल नाका रोडवर आरसीसी चौक येथे गीता कदम या थालीपीठ हाऊस हे छोटेसे हॉटेल चालवतात. तब्बल 13 प्रकारचे चविष्ट आणि पौष्टिक थालीपीठ या ठिकाणी मिळतात. खरंतर गीता यांना पहिल्यापासूनच स्वयंपाकात रुची होती. त्यात त्यांच्या आजींनी त्यांना विविध प्रकारचे थालीपीठ बनवायला शिकवले. त्यामुळे त्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने थालीपीठ बनवून घरच्यांची वाहवा मिळवत असत.
advertisement
स्वयंपाकाच्या आवडीमुळे आपले एखादे छोटेसे हॉटेल सुरू करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला. कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरात गेल्या काही वर्षांपूर्वी हे हॉटेल सुरू केले होते. पण कोरोना काळात ते हॉटेल बंद करावे लागले. त्यानंतर या नवीन ठिकाणी गेले 2-3 वर्ष चांगल्या पद्धतीने खवय्यांचा प्रतिसाद मिळत आहे, असे गीता कदम यांनी सांगितले.
advertisement
काय आहे थालीपीठाची विशेषता ?
गीता यांच्या हॉटेलमध्ये मिळणारे थालीपीठ हे खाण्यासाठी रुचकर चविष्ट आणि पौष्टिक असतात. कारण हे थालीपीठ बनवण्यासाठी विविध पीठांचे मिश्रण केले जाते. थालीपीठासाठी पीठ दळून आणताना साधारण 12 कडधान्यांच्या भाजणीचा वापर केला जातो. तर या एकाच पिठाचे 13 प्रकारचे थालीपीठ बनवले जातात, त्यामुळे इथे मिळणारे प्रत्येक थालीपीठ पौष्टिक आणि सात्विक असते, असे गीता सांगतात.
advertisement
थालीपीठाचे विविध प्रकार
इथे साधे थालीपीठ, थालीपीठ स्पे. उसळ कांम्बो 2 नग, स्पे. उसळ थालीपीठ, चिज थालीपीठ, लोणी थालीपीठ, मेथी थालीपीठ, काकडी थालीपीठ, कांदा पात थालीपीठ, बटाटा थालीपीठ, पालक थालीपीठ, गाजर थालीपीठ, कोबी थालीपीठ, उपवासाचे थालीपीठ, जैन थालीपीठ असे हे 12 प्रकारचे थालीपीठ मिळतात. त्यापैकी उपवासाचे थालीपीठ फक्त श्रावण महिन्यात उपलब्ध असतात. तर थालीपीठ व्यतिरिक्त खांडोळी साउथ इंडियन नाष्टा असेही या हॉटेलमध्ये मिळते. तसेच गीता यांच्या पती आणि मुलाने सुरू केलेल्या दुसऱ्या शाखेमध्ये जेवण देखील मिळते.
advertisement
कसे बनवले जातात थालीपीठ ?
थालीपीठ बनवण्यासाठी जे पीठ लागते ते पीठ गीता यांच्याकडे तयार असते. वेगवेगळ्या 12 कडधान्यांची भाजणी करुन बनवलेले हे पीठ सर्व प्रकारचे थालीपीठ बनवण्यासाठी वापरले जाते. ज्या प्रकारचे थालीपीठ ग्राहकांना हवे आहे तो पदार्थ त्या पिठात मिसळला जातो. उदा. जर एखाद्याला पालक थालीपीठ हवे असेल तर आधीच वाफवून घेतलेली पालकची पाने व रस या पिठात मिसळले जाते, अशी माहिती देखील गीता यांनी दिली आहे
advertisement
दरम्यान, फक्त 40 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत हे विविध प्रकारचे थालीपीठ या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर त्या व्यतिरिक्त अजूनही नाश्त्याचे पदार्थ देखील या ठिकाणी मिळतात. सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे थालीपीठ हाऊस हॉटेल सुरू असते. बरेचसे खवय्ये त्याचबरोबर विद्यापीठातील विद्यार्थी या ठिकाणी थालीपीठांची चव चाखण्यासाठी येत असतात.
पत्ता : थालीपीठ हाऊस, आरसीसी चौक, शिवाजी विद्यापीठ ते शाहू टोल नाका रोड, कोल्हापूर - 416004
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
June 07, 2024 7:14 PM IST

