मकर संक्रांतीचे लाडू म्हणजे आरोग्यासाठी खजिना! फायदे वाचाल तर म्हणाल, 'तीळगूळ घ्या, निरोगी राहा'
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
Makar Sankranti Special: मकर संक्रांतीला तीळ, गुळाचेच लाडू का वाटतात बरं? विचार केलाय कधी? प्रसिद्ध आहारतज्ज्ञ प्रतीक्षा जाधव सांगतात...
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : मकर संक्रांत सण आता काहीच दिवसांवर आहे. या दिवशी घराघरातून खमंग तिळाच्या लाडूंचा सुगंध येईल. सर्वजण एकमेकांना 'तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला', असं म्हणतील. परंतु मकर संक्रांतीला तीळ, गुळाचेच लाडू का वाटतात बरं? विचार केलाय कधी? कारण हा सण हिवाळ्यात येतो म्हणून.
हिवाळ्यात सर्दी, खोकला होणं अगदी सामान्य वाटतं. या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यानं विविध आजार जडण्याचा धोका असतो. म्हणूनच आहारतज्ज्ञ बदलत्या वातावरणानुसार आपल्या आहारात बदल करण्याचा सल्ला देतात. हिवाळा सुरू झाला की शरीराला उब मिळणं आवश्यक असतं. यासाठी आहारात सुकामेवा आणि तीळगुळाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
हिवाळ्यासाठी तीळगूळ हे सूपरफूड मानले जातात. कारण शरीराच्या थंडीपासून बचावासाठी तीळ आणि गूळ गुणकारी असतात. आयुर्वेदातही गूळ आणि तीळ खाण्याचे फायदे सांगितलेले आहेत. या दोन्ही पदार्थांपासून शरीरात उष्णता निर्माण होते. यामुळे शरीर उबदार राहण्यास मदत मिळते. तुम्ही केवळ मकर संक्रांतीलाच नाही, तर हिवाळ्यात इतर दिवशीदेखील तीळगुळाचे लाडू बनवून खाऊ शकता. तीळगुळाचा 1 लाडू किंवा 20-25 ग्रॅम तीळ दररोज खाल्ल्यानं अनेक मोठे फायदे मिळू शकतात, असं कोल्हापुरातील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ प्रतीक्षा जाधव सांगतात.
advertisement
तिळाचे फायदे काय?
तिळामध्ये प्रथिनं, कॅल्शियम, फायबर, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी1, तांबे आणि जस्त अशा शरीरासाठी पोषक असणाऱ्या घटकांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असते. तसंच तिळाच्या बियांमध्ये सेसमिन आणि सेसमोलिन नावाची 2 महत्त्वाची संयुगे असतात, जी कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध करतात. तसंच हृदयविकाराचा धोका कमी होतो. तिळामध्ये फायटोस्टेरॉल आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात, जे शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात.
advertisement
गुळाचे फायदे काय?
गूळ शरीराला उबदार ठेवण्यास फायदेशीर ठरतं. जे लोक दररोज गूळ खातात त्यांच्या शरीरात लोहाची कमतरता नसते. गूळ खाल्ल्यानं पचनशक्ती मजबूत होते. गुळामुळे थकवा दूर होऊ शकतो. गुळात अँटिऑक्सिडंट्स आणि फिनोलिक ॲसिड असतं ज्यामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसची पातळी कमी होते.
तीळगूळ कोणी खाऊ नये?
मधुमेहाच्या रुग्णांनी तीळगुळाचं जास्त सेवन करू नये. गूळ खाल्ल्यानं रक्तातली साखर झापाट्यानं वाढू शकते. तिळाच्या बियांमध्ये काही सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात, ते जास्त खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. त्यामुळे 5 ग्रॅमपेक्षा जास्त तिळाचं सेवन करू नये.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
January 11, 2025 12:06 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
मकर संक्रांतीचे लाडू म्हणजे आरोग्यासाठी खजिना! फायदे वाचाल तर म्हणाल, 'तीळगूळ घ्या, निरोगी राहा'