Makeup Tips: सणासुदीला मेकअप करताय? काढतानी या चुका टाळा, चेहरा दिसेल तजेलदार, Video
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
चेहऱ्यावरील मेकअप योग्य पद्धतीने न काढल्यास पिंपल्स, पुरळ, चेहरा कोरडा पडणे, त्वचेवर अकाली सुरकुत्या येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे मेकअप काढण्याची योग्य पद्धत माहिती असणे गरजेचे आहे.
अमरावती: दसरा, दिवाळी किंवा कोणताही सण आला की महिलांचा उत्साह अधिकच वाढतो. रंगीबेरंगी कपडे, आकर्षक दागिने आणि त्यासोबत नटून-थटून केलेला मेकअप यामुळे महिलांचा आनंद दुप्पट होतो. मात्र दिवस संपल्यानंतर हा मेकअप काढताना अनेक महिला काही चुका करतात. या छोट्या वाटणाऱ्या चुका त्वचेवर गंभीर परिणाम घडवतात. पिंपल्स, पुरळ, चेहरा कोरडा पडणे, त्वचेवर अकाली सुरकुत्या येणे अशा अनेक समस्या यामुळे निर्माण होतात. त्यामुळे मेकअप काढण्याची योग्य पद्धत माहिती असणे गरजेचे आहे. मेकअप काढताना कोणत्या चुका टाळाव्यात. तसेच चेहऱ्यावरील मेकअप काढण्याची योग्य पद्धत कोणती? याबाबत माहिती, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
मेकअप काढताना कोणत्या चुका टाळाव्यात?
त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, केवळ पाण्याने चेहरा धुतल्यास मेकअप पूर्णपणे निघत नाही. काही महिला साबण वापरतात. परंतु त्यामुळे त्वचा कोरडी आणि संवेदनशील बनते. डोळ्यांचा मेकअप जोरात चोळून काढण्याची चुकीची सवय अनेकांना असते. यामुळे डोळ्यांभोवती बारीक सुरकुत्या निर्माण होतात आणि पापण्या गळण्याचा धोका वाढतो. काही वेळा महिलांना थकवा असल्याने त्या मेकअप न काढताच झोपतात, मात्र यामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात आणि दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावर पिंपल्स दिसू लागतात. आणखी एक महत्त्वाची चूक म्हणजे संपूर्ण मेकअप एकाच कॉटनने पुसणे. या प्रक्रियेमुळे चेहऱ्यावर जंतुसंसर्ग होऊ शकतो.
advertisement
काही महिला फक्त वाइप्स वापरतात, पण त्यामुळे मेकअप काही प्रमाणातच निघतो आणि त्वचेत रसायनं शिल्लक राहतात. तसेच मेकअप काढल्यानंतर मॉइश्चरायझर न लावल्याने त्वचा कोरडी पडते आणि नंतर जास्त तेलकट होण्याचा त्रास वाढतो. यासर्व चुका टाळणे गरजेचे आहे. यामुळे त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता असते.
advertisement
मेकअप काढण्याची योग्य पद्धत कोणती?
मेकअप योग्य पद्धतीने काढण्याची प्रक्रिया अगदी साधी आहे. सर्वात आधी हात व्यवस्थित धुवून घ्यावेत. जेणेकरून चेहऱ्यावर जंतूसंसर्ग होऊ नये. त्यानंतर डोळ्यांचा मेकअप आधी काढावा. यासाठी कॉटनवर मेकअप रिमूव्हर किंवा घरगुती पर्याय म्हणून नारळ तेल वापरता येऊ शकतं. हे कॉटन 15 सेकंद हलक्या दाबाने डोळ्यांवर ठेवावं आणि मग सावकाश पुसून टाकावं. डोळ्यांनंतर ओठांचा मेकअप दुसऱ्या कॉटनने हळुवारपणे पुसावा. नंतर संपूर्ण चेहऱ्यावर रिमूव्हर लावून गोलाकार मसाज करावा, यामुळे मेकअप सहज सैल होतो. मग कोमट पाण्याने चेहरा धुवावा. पुढच्या टप्प्यात हलक्या फेसवॉशने चेहरा स्वच्छ करावा, ज्यामुळे उरलेले रसायनं आणि मेकअपचे अंश पूर्णपणे निघून जातात. शेवटी हलका क्रीम किंवा अॅलोवेरा जेल लावल्यास त्वचा मऊ राहते आणि कोरडेपणापासून बचाव होतो, अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सणासुदीला मेकअप करणं जितकं आनंददायी असतं तितकंच तो योग्य पद्धतीने काढणंही अत्यावश्यक आहे. चुकीच्या पद्धतीमुळे त्वचेला दीर्घकालीन नुकसान होऊ शकतं. त्यामुळे दरवेळी योग्य प्रक्रिया वापरून चेहरा स्वच्छ ठेवावा. म्हणूनच महिलांनी डोळे, ओठ, चेहरा, फेसवॉश, मॉइश्चरायझर हा क्रम नेहमी लक्षात ठेवावा. सणानंतर काही क्षण स्वतःच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी दिल्यास चेहरा कायमस्वरूपी तजेलदार आणि निरोगी राहू शकतो, असेही त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितले.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Sep 30, 2025 2:58 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Makeup Tips: सणासुदीला मेकअप करताय? काढतानी या चुका टाळा, चेहरा दिसेल तजेलदार, Video








