पॅकेज्ड फूडच्या नादी लागू नका, चव ठरू शकते घातक, प्रिझर्वेटिव्ह्जमुळे वाढतो मधुमेह आणि कर्करोगाचा धोका
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
पॅकेज्ड फूडच्या नादी लागू नका, कारण याची चव घातक ठरू शकते, यातल्या प्रिझर्वेटिव्ह्जमुळे मधुमेह आणि कर्करोगाचा धोका वाढतो हे संशोधनातून समोर आलंय.
मुंबई : आपण काय खातो यावर प्रकृती अवलंबून आहे. तुमच्याही घरात वरचेवर बाहेरचे पदार्थ येतात का ? पॅकेज्ड फूड किंवा अल्ट्रा प्रोसेस्ड फूड तुमच्या आहारात असतील तर ते धोक्याचं आहे.
पॅकेज्ड फूडच्या नादी लागू नका, कारण याची चव घातक ठरू शकते, यातल्या प्रिझर्वेटिव्ह्जमुळे मधुमेह आणि कर्करोगाचा धोका वाढतो हे संशोधनातून समोर आलंय.
'नेचर कम्युनिकेशन्स' आणि 'द बीएमजे' या वैद्यकीय जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या निकालांनुसार, प्रिझर्व्हेटिव्ह्जच्या अतिसेवनाचा आणि गंभीर आजारांचा थेट संबंध आढळून आला आहे. संशोधकांनी 2009 ते 2023 दरम्यान एक लाखांहून अधिक फ्रेंच रहिवाशांच्या आहार आणि आरोग्य डेटाचं विश्लेषण केलं. न्यूट्रीनेट-सँटे नावाच्या चौदा वर्षांच्या अभ्यासात, आपल्या शरीरावर प्रिझर्व्हेटिव्ह्जचा होणारा परिणाम यात तपासण्यात आला.
advertisement
मधुमेहाचा धोका - नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित झालेला हा अभ्यास जगातील पहिला आहे ज्यात प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि टाइप 2 मधुमेह यांच्यातील संबंध आढळला आहे. याचे परिणाम अत्यंत चिंताजनक आहेत.
एकूण 17 प्रिझर्व्हेटिव्ह्जची चाचणी घेण्यात आली, त्यापैकी 12 प्रिझर्व्हेटिव्ह्ज जास्त प्रमाणात खाल्ल्यानं टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढवतात असं आढळून आलं. एकूणच, ज्यांनी जास्त प्रिझर्व्हेटिव्ह्ज खाल्ले त्यांना मधुमेह होण्याचा धोका 47% जास्त होता. हा धोका नॉन-अँटीऑक्सिडंट प्रिझर्वेटिव्ह्जसाठी 49% जास्त आणि अँटिऑक्सिडंट ॲडिटीव्हजसाठी 40% जास्त असल्याचं आढळून आलं.
advertisement
कर्करोगाचा धोका - सर्वच प्रिझर्वेटिव्ह्ज कर्करोगास कारणीभूत नसले तरी, काही रसायनांचं जास्त प्रमाण कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. द बीएमजेमध्ये प्रकाशित झालेल्या कर्करोगाच्या अभ्यासातली ही निरीक्षणं आहेत.
पोटॅशियम सॉर्बेटचं जास्त सेवन केल्यानं एकूण कर्करोगाचा धोका 14% आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका 26% वाढू शकतो. सोडियम नायट्रेटमुळे प्रोस्टेट कर्करोगाचा धोका 32% वाढू शकतो. पोटॅशियम नायट्रेटमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका 22% वाढतो. सल्फाइट्समुळेही कर्करोगाचा धोका 12% नी वाढतो.
advertisement
अॅसिटेट्स आणि अॅसिटिक अॅसिडमुळे कर्करोगाचं प्रमाण वाढू शकतं. ही रसायनं आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करु शकतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.
कर्करोगाच्या दरात झालेली ही वाढ किरकोळ वाटत असली तरी, लोकसंख्येच्या पातळीवर पाहिलं तर ही एक महत्त्वाची आणि गंभीर बाब आहे. हा एक निरीक्षणात्मक अभ्यास होता, म्हणून संशोधक थेट कारणं आणि परिणामाचा दावा करत नाहीत, परंतु निकाल लक्षणीय आहेत. म्हणूनच त्यांनी ग्राहकांना पॅकेज्ड किंवा अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांऐवजी ताजे आणि कमीत कमी प्रक्रिया केलेले पदार्थ त्यांच्या आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 6:45 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
पॅकेज्ड फूडच्या नादी लागू नका, चव ठरू शकते घातक, प्रिझर्वेटिव्ह्जमुळे वाढतो मधुमेह आणि कर्करोगाचा धोका









