HMPV Virus : एचएमपीव्ही व्हायरस, आहे काय? लक्षणांपासून उपचारापर्यंत संपूर्ण माहिती एका क्लिकवर
- Published by:Priya Lad
- trending desk
Last Updated:
HMPV Virus In India : 'चीननंतर भारतात देखील एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले आहेत. हा व्हायरस नेमका काय आहे, कुठून आला, त्याची लक्षणं आणि त्यावरील उपचार काय याची संपूर्ण माहिती घेऊया.
नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगाने कोरोना महासाथीची दहशत अनुभवली आहे. त्यावेळी कोरोनाचा उद्रेक चीनमधून झाला होता, असं म्हटलं जातं. आताही चीनमध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावरील अनेक पोस्ट्सनुसार, चीन सध्या आणखी एका साथीच्या आजाराशी झुंज देत आहे. तिथं ह्युमन मेटान्युमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) प्रादुर्भाव झाला आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, भारतात देखील एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले आहेत. हा व्हायरस नेमका काय आहे, कुठून आला, त्याची लक्षणं आणि त्यावरील उपचार काय याची संपूर्ण माहिती घेऊया.
यूएस सेटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शनच्या (सीडीसी) नोंदीनुसार, एचएमपीव्हीचा शोध 2001 मध्ये लागला. तो न्यूमोव्हायराइड फॅमिलीतील असून रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरसशी (RSV) साम्य असलेला आहे. तो सामान्यत: अप्पर आणि लोअर रेस्पिरेटरी संक्रमणास कारणीभूत ठरतो. त्याची लक्षणं सर्दी किंवा फ्लूसारखी असतात. सीडीसीच्या मते, सर्व वयोगटांतील व्यक्तींवर याचा परिणाम होतो. त्यामध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना सर्वांत जास्त धोका आहे.
advertisement
एचएमपीव्हीची लक्षणं
सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, एचएमपीव्हीची लागण झाल्यानंतर, खोकला येणं, सर्दी होणं, ताप, घसा खवखवणं, छातीत घरघर होणं किंवा श्वास घेण्यास अडचण येणं इत्यादी लक्षणं दिसतात. काही रुग्णांना ब्राँकायटिस, न्यूमोनिया किंवा दम्याचा त्रास जाणवू शकतो.
advertisement
सर्वात जास्त धोका कोणाला?
पाच वर्षांखालील मुले, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती आणि कमकुवत रोगप्रतिकारकशक्ती असलेल्या व्यक्ती, अस्थमा किंवा सीओपीडीसारख्या श्वसनसमस्या असलेल्या व्यक्तींना या व्हायरसचा जास्त धोका असतो.
एचएमपीव्हीचा प्रसार कसा होतो?
खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर त्याच हातांनी इतरांना स्पर्श केल्यास, संपर्कातून, दूषित पृष्ठभागांना स्पर्श केल्यास, दूषित हातांनी तोंड, नाक किंवा डोळ्यांना स्पर्श केल्यास एचएमपीव्ही पसरतो. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, या व्हायरसचा सिझनल पॅटर्न असतो. तो समशीतोष्ण प्रदेशात हिवाळ्याच्या शेवटी आणि वसंत ऋतूमध्ये पसरतो.
advertisement
प्रसार रोखण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
- साबण आणि पाण्याने किमान 20 सेकंद हात धुवावेत.
- न धुतलेल्या हातांनी चेहऱ्याला स्पर्श करू नये.
- प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी वावरताना मास्क वापरा.
- आजारी असताना घरीच रहा जेणेकरून विषाणूचा प्रसार रोखता येईल.
advertisement
- वारंवार स्पर्श होणारी ठिकाणं नियमितपणे स्वच्छ करावीत.
चाचणी आणि निदान
न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेस्टच्या (NAAT) माध्यमातून व्हायरल जीनोमचा शोध घेता येतो. इम्युनोफ्लोरसन्स किंवा एन्झाइम इम्युनोस वापरून श्वसन स्रावांमधील व्हायरल अँटिजेनचा शोध घेता येतो. लक्षणं गंभीर नसल्यास किंवा उद्रेक झाल्याशिवाय सामान्य चाचणी करून घेणं कठीण आहे.
उपचार
एचएमपीव्हीसाठी कोणतेही विशिष्ट अँटिव्हायरल उपचार किंवा लस नाही. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, लक्षणं कमी करण्यावर भर दिला पाहिजे:
advertisement
- हायड्रेटेड राहा आणि योग्य विश्रांती घ्या.
- वेदना, रक्तसंचय आणि ताप यासाठी ओव्हर-द-काउंटर (OTC) औषधे वापरा.
- गंभीर प्रकरणांमध्ये ऑक्सिजन थेरेपी किंवा इंट्राव्हेनस फ्लुइड्ससाठी हॉस्पिटलायझेशनची गरज भासू शकते.
वैद्यकीय मदत कधी घ्यावी?
- प्रकृती बिघडली तर रुग्णालयात जावे.
- श्वास घेण्यात अडचण आल्यास किंवा सायनॉसिस (निळसर त्वचा) दिसल्यास.
- सीओपीडी किंवा दमा यांसारख्या दीर्घकालीन आरोग्य समस्या वाढल्यास.
advertisement
एचएमपीव्हीमुळे श्वसन संक्रमण वाढत असलं तरी त्यामुळे साथीचा धोका नाही. एचएमपीव्हीची हंगामी वाढ सामान्य आहे. कारण, कोविड-19 लॉकडाउननंतर आता मोठ्या प्रमाणात लोक पुन्हा रोगजनकांच्या संपर्कात आले आहेत.
एचएमपीव्ही आणि कोविड-19ची तुलना
WebMDने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, एचएमपीव्ही आणि कोविड-19 मध्ये साम्य आहे. कारण दोन्ही विषाणूंची लागण झाल्यानंतर खोकला, ताप, घसा खवखवणं आणि श्वास्सनास अडचणी येणं यांसारख्या समस्या उद्भवतात. दोन्ही विषाणू रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून पसरतात. गंभीर प्रकरणांमध्ये हॉस्पिटलायझेशनची गरज भासते.
एनडीटीव्हीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, एचएमपीव्ही सामान्यत: हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये जास्त प्रमाणात पसरतो. याउलट कोविड-19चा प्रसार वर्षभरात केव्हाही होऊ शकतो. काही संशोधनांच्या निष्कर्षांनुसार, कोविड-19च्या वेळी लावलेले निर्बंध उठवल्यानंतर काही प्रदेशांमध्ये एचएमपीव्हीच्या रुग्ण संख्येत तिप्पट वाढ झाली आहे. लॉकडाउनदरम्यान विषाणूंच्या संपर्कात घट झाल्यामुळे लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याची शक्यता आहे.
Location :
Delhi
First Published :
January 06, 2025 4:27 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
HMPV Virus : एचएमपीव्ही व्हायरस, आहे काय? लक्षणांपासून उपचारापर्यंत संपूर्ण माहिती एका क्लिकवर