बेसनचे लाडू बिघडतात? या सिक्रेट टिप्स वापरा आणि दिवाळी गोड करा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
दिवाळीत बेसनचे लाडू बनवण्याची सोपी पद्धत डोंबिवलीतील नेहा जोशी यांनी सांगितली आहे.
डोंबिवली, 8 नोव्हेंबर: दिवाळी तोंडावर येऊन ठेपली आहे. घराघरातून लाडू आणि चिवडा बनवण्याचा सुवास दरवळत आहे. दिवाळीतील सगळ्यात महत्त्वाचा फराळ म्हणजे लाडू. बेसन लाडू हा बनवायला सोपा प्रकार असला तरी तो सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. मात्र हा लाडू बनवायची एक विशिष्ट पद्धत आहे. हा लाडू त्या पद्धतीने बनवला गेला नाही तर लाडवाला खास चव येत नाही. हा लाडू चविष्ट कसा बनवावा याच्या काही सिक्रेट टिप्स डोंबिवली येथील नेहा जोशी यांनी दिल्या आहेत.
बेसन लाडूसाठी साहित्य
3 वाट्या भरून बेसन, 1 सपाट वाटी कणिक, दीड ते 2 वाट्या साजूक तूप, अर्धा ते पाऊण कप दूध, अडीच वाट्या पिठीसाखर किंवा बुरा साखर, वेलची पूड, बेदाणे, काजू तुकडे
बेसन लाडूची कृती
बेसन आणि कणिक दोन्ही एकत्र करून कढईत पाच मिनिटे कोरडे भाजावे. त्यानंतर दीड वाटी साजूक तूप टाकावे. पुन्हा मंद आचेवर भाजावे. त्यानंतर पुन्हा अर्धा वाटी तूप टाकून भाजत राहावे. बेसनाचा रंग हलका लालसर होईपर्यंत आणि सुवास दरवळे पर्यंत मंद आचेवर भाजत राहावे. त्यात पाऊण कप दूध टाकावे. ते दूध भाजलेल्या बेसन पिठात टाकल्यानंतर गॅस बंद करावा आणि पीठ पूर्ण कोरडे होईपर्यंत ढवळावे. त्यानंतर गार होईपर्यंत झाकून ठेवावे. त्यात पिठीसाखर, वेलची पावडर आणि सुका मेवा टाकून मिक्स करावे. हलकेच लाडू वळून घ्यावे.
advertisement
गेल्या 40 वर्षापासून ही रेसिपी नेहा जोशी करत आहेत. त्यांना त्यांच्या सासू बाईंनी या टीप्स दिल्या होत्या असे त्यांनी सांगितले. बेसन पीठ मंद आचेवर खरपूस भाजले तरच लाडू चवीला उत्तम होतो असेही नेहा यांनी सांगितले. तर ही रेसिपी करून तुम्ही आपली दिवाळी गोड करू शकता.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
November 08, 2023 9:53 AM IST