Colon Cancer : पोटदुखी, थकव्याकडे दुर्लक्ष नको, असू शकते धोक्याची घंटा, वाचा सविस्तर माहिती
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
सतत पोटदुखी होत असेल तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करु नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अधूनमधून पोटदुखी होणं सामान्य आहे, पण वेदना विशेषतः एकाच भागात दीर्घकाळ टिकल्या, तर त्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे.
मुंबई : कॅन्सर अर्थात कर्करोग म्हणजे शरीराचं अंतर्बाह्य नुकसान करणारी व्याधी. शरीराच्या विविध भागांत कर्करोग फैलावू शकतो.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या 2026 च्या अहवालानुसार, 1990 पासून पन्नास वर्षांखालील अमेरिकन लोकांमधे कर्करोगानं होणाऱ्या मृत्यूंमधे 44 टक्क्यांनी घट झाली आहे. सुधारित उपचार आणि धूम्रपान कमी झाल्यामुळे हे मोठं यश मिळू शकलं. पण, या दिलाशाबरोबरच एक चिंताजनक निष्कर्ष समोर आला आहे. कोलन कर्करोगाच्या म्हणजेच आतड्यांचा कॅन्सर होण्याच्या घटनांमधे वाढ होत आहे.
advertisement
फुफ्फुस, स्तन आणि मेंदूच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमधे घट झाली असली तरी, लहान वयात होणारा कोलोरेक्टल कर्करोगाचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय. पन्नास वर्षांखालील पुरुषांमधे कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचं हे प्रमुख कारण ठरतंय.
सतत पोटदुखी होत असेल तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करु नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अधूनमधून पोटदुखी होणं सामान्य आहे, पण वेदना विशेषतः एकाच भागात दीर्घकाळ टिकल्या, तर त्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे.
advertisement
शरीरात कोणती लक्षणं दिसली तर सतर्क राहायला हवं समजून घेऊयात.
वजन अचानक कमी होणं - वजन अचानक कमी होणं हे देखील धोक्याचं लक्षण असू शकतं. आहार सामान्य असूनही वजन कमी होत असेल तर ते चिंतेचं कारण आहे. कर्करोगाच्या पेशी शरीराची बरीच ऊर्जा वापरतात, ज्यामुळे अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो. कपडे सैल वाटू लागले आणि वजन कमी होण्याचं कारण स्पष्ट नसेल, तर चाचणी करणं महत्वाचं आहे.
advertisement
सतत थकवा येणं - सतत थकवा येणं हे देखील एक महत्त्वाचं लक्षण आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे थकवा येतो, पण विश्रांतीनंतरही अशक्तपणा कायम राहिला तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. आतड्यांच्या कर्करोगामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो, ज्यामुळे रक्त कमी होतं आणि सतत थकवा येतो.
advertisement
मल समस्या - शौचात रक्त येणं हे एक गंभीर लक्षण आहे. बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, अनेकदा याला मूळव्याध समजण्याची मोठी चूक होऊ शकते. शौचात रक्त दिसलं तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. लाल रक्त कधीकधी सौम्य समस्येचं लक्षण असू शकतं, पण गडद रक्त अधिक गंभीर कारणाचं लक्षण असू शकतं.
याव्यतिरिक्त, आतड्यांच्या सवयींमधे होणारे बदल देखील लक्षात घेण्यासारखे आहेत. दीर्घकालीन बद्धकोष्ठता किंवा अचानक अतिसार होणं याकडे दुर्लक्ष करु नका. हे बदल काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत राहिले तर चाचणी करणं महत्वाचं आहे. वेळेवर निदान आणि उपचार करून धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 5:22 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Colon Cancer : पोटदुखी, थकव्याकडे दुर्लक्ष नको, असू शकते धोक्याची घंटा, वाचा सविस्तर माहिती









