मुंबईकरांसाठी गुड न्यूज! राणीच्या बागेत पेंग्विननंतर नवे परदेशी पाहुणे; रसेल वायपर अन् जॉन बॉ!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Ranichi Baug: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता राणीच्या बागेत पेंग्विननंतर आणखी खास प्राणी पाहता येणार आहेत. त्यासाठी अत्याधुनिक सर्पालय उभारलं जातंय.
मुंबई: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. भायखळ्यातील राणीची बाग आता आणखी रंगतदार होणार आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आता नव्या रूपात पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार आहे. वाघ, पेंग्विन, हत्ती यांसारख्या प्राण्यांनंतर आता येथे विदेशी सापांचाही समावेश होणार असून, त्यासाठी विशेष आधुनिक सर्पालय उभारण्याची तयारी सुरू आहे.
या प्रकल्पाला केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर नगरपालिकेकडून आराखडा आणि अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील काही आठवड्यांत आराखड्याची छाननी पूर्ण होऊन निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.
विविध हवामानासाठी विशेष व्यवस्था
हे सर्पालय सुमारे 16,800 चौरस फूट जागेवर बांधले जाणार असून, विविध प्रजातींच्या सापांना आवश्यक ते वातावरण मिळावे यासाठी अत्याधुनिक तापमान नियंत्रण प्रणाली बसवली जाणार आहे. काही सापांना थंड वातावरण, काहींना दमट तर काहींना उष्ण वातावरण लागते. हे सर्व विचारात घेऊन वेगवेगळ्या तापमान क्षेत्रांची निर्मिती करण्यात येईल.
advertisement
आकर्षण ठरणार विदेशी साप
नव्या सर्पालयात ट्रिकेत संके, जॉन बॉ, रेड सेंड बॉ, व्हितकेर बॉ, रसेल वायपर, इंडियन कोब्रा, बँडेड क्रेट, रॉक पायथॉन यांसारख्या सापांसोबत मॉनिटर लिझार्ड आणि अजगर देखील पाहायला मिळतील. यामुळे पर्यटकांना स्वदेशी तसेच विदेशी दोन्ही प्रजाती जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.
महसूल आणि लोकप्रियतेत वाढ अपेक्षित
राणीच्या बागेत पेंग्विनसारख्या प्राण्यांच्या आगमनानंतर पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढली असून दरवर्षी सुमारे 10 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. आगामी सर्पालयामुळे या संख्येत आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा प्राणीसंग्रहालय प्रशासनाची आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 11:01 AM IST
मराठी बातम्या/Travel/
मुंबईकरांसाठी गुड न्यूज! राणीच्या बागेत पेंग्विननंतर नवे परदेशी पाहुणे; रसेल वायपर अन् जॉन बॉ!