व्हॉलीबॉलचा 'तो' डाव ठरला शेवटचा! बॉल काढायला पाण्यात उतरला, दुसऱ्या दिवशी बॉडी...
- Published by:Prachi Amale
Last Updated:
नदीत उतरलेल्या तरुणाचा शोध अनेक तासांपासून सुरु होता. अखेर दुसऱ्या दिवशी तरुण मृतावस्थेत सापडला
रायगड : पेण तालुक्यातील भोगावती नदीच्या पात्रात व्हॉलीबॉल खेळताना एका २० वर्षीय तरुणाचा बुडून झालेला मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नदीत उतरलेल्या तरुणाचा शोध अनेक तासांपासून सुरु होता. अखेर दुसऱ्या दिवशी तरुण मृतावस्थेत सापडला. तरुणाच्या शोधासाठी रेक्स्यू पथकाला पाचारण करण्यात आलं होतं. या दुर्दैवी घटनेने पेण परिसरावर शोककळा पसरली आहे.
पिंपळडोह येथील भोगावती नदीच्या पात्रात व्हॉलीबॉल खेळताना वसिम शेख अन्सारी या २० वर्षीय तरुणाचा बुडून झालेला मृत्यू संपूर्ण पेण तालुक्यासाठी चटका लावून जाणारा ठरला आहे. वसिम त्याच्या मित्रांसोबत पिंपळडोह येथे व्हॉलीबॉल खेळत होते. त्यावेळी बॉल पपाण्यात गेला. तो काढण्यासाठी वसिम पाण्यात उतरला. मात्र दम लागल्याने तो नदीत बुडाला. केवळ पाण्यात गेलेला बॉल काढण्याच्या प्रयत्नात वसिमचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी नदीकिनाऱ्यावर वावरताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
कसा सापडला मृतदेह?
घटनेच्या पहिल्या दिवशी स्थानिक नागरिकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र नदीचा खोल डोह आणि पाण्याचा अंदाज येत नसल्याने यश आले नाही. पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी तातडीने सूत्रे हलवत 'हेल्थ फाऊंडेशन खोपोली' आणि 'SVRSS कोलाड' या रेस्क्यू टीमला पाचारण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी या टीमने जिवाची पर्वा न करता पाण्यात सूर मारला आणि साडेतीन तासांच्या कठोर परिश्रमानंतर वसिमचा मृतदेह शोधून काढला. रेस्क्यू टीमच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या पोलीस घटनास्थळी पंचनामा पूर्ण केला असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अधिक तपास करत आहेत.
advertisement
नागरिकांना प्रशासनाचे आवाहान
भोगावती नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी खोल डोह आहेत, ज्याचा अंदाज पोहणाऱ्यालाही येत नाही. नदीकाठी खेळताना किंवा फिरताना मुले अनेकदा उत्साहाच्या भरात पाण्याचा अंदाज घेत नाहीत जे जीवावर बेतू शकते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर पेण पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने नदीकिनाऱ्यावरील गस्त वाढवली असून, धोकादायक ठिकाणी फलक लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
advertisement
पालकांना प्रशासनाचे आवाहन
पालकांनी आपल्या पाल्यांकडे विशेष लक्ष द्यावे. मुले पाण्याच्या संपर्कात जात असताना त्यांच्यासोबत एखादी जबाबदार व्यक्ती असणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वसिमच्या मृत्यूने एक कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे हीच काळाची गरज आहे.
Location :
Raigad,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 7:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
व्हॉलीबॉलचा 'तो' डाव ठरला शेवटचा! बॉल काढायला पाण्यात उतरला, दुसऱ्या दिवशी बॉडी...








