AC Local: लोकलच्या गर्दीतून मुंबईकरांची सुटका होणार? 21 हजार कोटी खर्चून 238 एसी लोकलची खरेदी
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
AC Local: लोकल खरेदीबाबत मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) सुधारित प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
मुंबई: लोकलला मुंबईची जीवनवाहिनी म्हटलं जातं. दररोज लाखो प्रवासी लोकल सेवेचा लाभ घेतात. मात्र, दिवसेंदिवस मुंबई आणि उपनगरांतील लोकसंख्या वाढत असल्याने लोकलमधील गर्दी देखील वाढत आहे. प्रत्येक लोकल ट्रेन खचाखच भरून जाताना दिसते. मात्र, भविष्यात ही स्थिती बदलण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने 238 एसी लोकल ट्रेन खरेदीच्या योजनेला गती दिली आहे. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून 12 डब्यांऐवजी 15 किंवा 18 डब्यांच्या एसी लोकल ट्रेनची निर्मिती केली जाणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लोकल खरेदीबाबत मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) सुधारित प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मुंबईतील वाढत्या रेल्वे प्रवासी संख्येचा विचार करून एमआरव्हीसीने दोन आठवड्यांपूर्वी राज्य सरकारला 238 एसी लोकल ट्रेनसंबंधी सुधारित योजना सादर केली होती. एकूण 2,856 डब्यांच्या नवीन ट्रेन वेस्टर्न आणि सेंट्रल लाईनवर धावणार आहेत. नवीन डब्यांसाठी याच महिन्यात निविदा जारी केल्या जाणार आहेत.
advertisement
वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 9 जून रोजी मुंब्र्यात झालेल्या लोकल अपघातात पाच प्रवाशांचा बळी गेला होता. या घटनेनंतर लोकल ट्रेनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे आता नवीन 238 एसी लोकल ट्रेन खरेदीच्या योजनेला गती मिळाली आहे. सध्या एसी लोकलच्या ताफ्यात 12 डब्यांच्या गाड्या आहेत. त्यांना नवीन डबे लावता येणार नाहीत. पण, नवीन 238 एसी लोकल ट्रेनला 15 किंवा 18 डबे जोडणे शक्य आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी) अंतर्गत 2,856 एसी कोच खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी 21 हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
advertisement
एसी लोकल ट्रेन खरेदी करण्याची योजना 2019 मध्येच तयार करण्यात आली होती. मात्र, सहा वर्षानंतर हा प्रस्ताव मार्गी लागत आहे. त्यामुळे खर्चात 9 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. भविष्यातील गरज विचारात घेऊन जास्त डब्यांच्या एसी लोकलची निर्मिती केली जात आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांत निविदा मागवल्या जाणार आहेत. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन समान प्रमाणात खर्च करेल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 05, 2025 10:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
AC Local: लोकलच्या गर्दीतून मुंबईकरांची सुटका होणार? 21 हजार कोटी खर्चून 238 एसी लोकलची खरेदी