आजचं हवामान: घराबाहेर पडताना काळजी घ्या! पुढचे ४ दिवस धोक्याचे, हवामान विभागाने या जिल्ह्यांना दिला अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Weather update 24 June - महाराष्ट्रात २४ ते २७ जूनदरम्यान पावसाचे वातावरण राहणार आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.
Weather update 24 June - महाराष्ट्रात पावसाने पुन्हा जोर धरला असून, पुढील चार दिवस म्हणजे २४ ते २७ जून या कालावधीत राज्याच्या विविध भागांत पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
advertisement
मुंबईत आज जोरदार पाऊस अपेक्षित असला तरी, २५ ते २७ जूनदरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. घाटमाथ्यावरील नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाचा विशेष अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवरील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता असून, काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.
advertisement
मैदानी भागांत मात्र पावसाची तीव्रता तुलनेने कमी राहणार आहे. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत २४ ते २७ जूनदरम्यान हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांत ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
advertisement
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे तर उर्वरित जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पावसाच्या तीव्रतेनुसार स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवून प्रवासाचे किंवा शेतीचे नियोजन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jun 24, 2025 7:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: घराबाहेर पडताना काळजी घ्या! पुढचे ४ दिवस धोक्याचे, हवामान विभागाने या जिल्ह्यांना दिला अलर्ट








