Ajit Pawar : सत्ता वाटपाचा तिढा अन् अजित पवारांनी साधलं टायमिंग, 'देवगिरी'वर दादांचा 'प्लान बी' सुरू
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ajit Pawar : विधानसभेत मिळालेल्या जबरदस्त यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आता आपली राजकीय पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या गोटात शांतता आहे. तर, दुसरीकडे सत्ताधारी महायुतीच्या गटात सत्ता वाटपावरून हालचाली सुरू आहेत. सत्ता वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या आता अखेरच्या टप्प्यातील जोर बैठका सुरू होणार आहेत. तर, दुसरीकडे विधानसभेत मिळालेल्या जबरदस्त यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आता आपली राजकीय पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
विधानसभा निवडणुकीत काकांना धोबीपछाड
ज्येष्ठ नेते आणि काका शरद पवार यांच्याशी फारकत घेत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या 40 आमदारांसह महायुतीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा राजकीय संघर्ष सुरू झाला. या संघर्षातील पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना शरद पवारांनी जोरदार धोबीपछाड दिला. तर, दुसरा राजकीय संघर्ष हा विधानसभेत दिसून आला. यामध्ये अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सव्याज परतफेड केली. शरद पवारांच्या तुतारीचा आवाज अजित पवारांनी दमदार विजयाने दाबला. आता, अजित पवार तिसऱ्या टप्प्यातील लढाईसाठी सज्ज झाले आहे.
advertisement
अजितदादांचा प्लान बी सुरू
महायुतीमध्ये सत्ता वाटपाचा तिढा सुरू असताना दुसरीकडे अजित पवारांनी आपला पुढील राजकीय डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. अजित पवारांनी शरद पवारांना आता धक्का देण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर अजित पवारांनी शरद पवार गटातील पराभूत उमेदवार, बंडखोरांना संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. आता, त्याला यश मिळू लागले आहे.
advertisement
कोणी घेतली अजितदादांची भेट?
मुंबईतील देवगिरी बंगल्यावर चांगलीच लगबग दिसून आली. श्रीगोंदा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी अजित पवार यांची भेट घेतली. श्रीगोंदा मतदारसंघात बंडखोरी केल्यामुळे शरद पवार गटाकडून जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता राहुल जगताप वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याशिवाय, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शिराळ्याचे माजी आमदार मानसिंग पवार हे अजित पवार यांच्या भेटीला आले. मानसिंग पवार हे देखील अजित पवार गटात सहभागी होण्याची शक्यता आहे.
advertisement
तर, दुसरीकडे अपूर्व हिरे हे देखील घरवापसीच्या तयारीत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार अपूर्व हिरे यांनी देखील अजित पवारांची भेट घेतली. अपूर्व हिरे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने त्यांची घरवापसी होण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2024 1:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : सत्ता वाटपाचा तिढा अन् अजित पवारांनी साधलं टायमिंग, 'देवगिरी'वर दादांचा 'प्लान बी' सुरू


