एकीकडे भुजबळ ओबीसींसाठी मैदानात, दुसरीकडे अजितदादांचा मराठ्यांसाठी पुढाकार, राष्ट्रवादीचं सोशल इंजिनिअरिंग!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
NCP Social Engineering: नाशिकमध्ये भुजबळांनी ओबीसींकरिता रोखठोक पत्रकार परिषद घेतली. त्याचवेळी मुंबईत अजित पवार यांनी मराठा समाजासाठी महत्त्वाच्या बैठका घेतल्या.
अक्षय आढाव, मुंबई : राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने कोणताही समाज घटक पक्षापासून दुरावू नये, यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विशेष प्रयत्न करीत आहे. मराठा आरक्षण आणि कुणबी दाखल्यांसाठी सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयाविरोधात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी रान उठवून ओबीसी मतांचे एकत्रीकरण होईल, याची काळजी घेतली आहे. ओबीसींची काळजी घेताना दुसऱ्या बाजूला मराठा समाजही आपल्यापासून दुरावणार नाही, याची काळजी खुद्द पक्षाचे अध्यक्ष अजित पवार घेताहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाचे वैशिष्ट्ये राहिलेले बेरजेचे राजकारण करून सोशल इंजिनिअरिंगद्वारे आगामी निवडणुकांत मतांची बेगमी जुळविण्याची पक्षाची रणनीती आहे.
मराठा समाजासाठी जारी केलेल्या शासन निर्णयाविरोधात दंड थोपटून छगन भुजबळ यांनी तीव्र लढा उभारण्याचे जाहीर केले आहे. मैदानावरील लढाईबरोबरच न्यायालयीन लढाईतही जोरकसपणे लढू, असे सांगत भुजबळ यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. भुजबळ ओबीसींचे तारणहार बनून लढत असताना राष्ट्रवादीला मतदान करणारा मराठा समाजही पक्षावर नाराज होऊ नये, यासाठी अजित पवार त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न करीत आहेत.
advertisement
ओबीसींसाठी छगन भुजबळ नाशिकमध्ये, मराठा समाजासाठी मुंबईत अजित पवारांची बैठक
छगन भुजबळ यांनी गुरूवारी नाशिकमध्ये विशेष पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणासंबंधी शासन निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी इकडे मुंबईत अजित पवार यांनी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
advertisement
निवडणुकीत मराठा आणि ओबीसींच्या मतांची बेगमी करण्यासाठी खेळी
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मराठा आणि ओबीसींच्या मतांची बेगमी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसोशीने प्रयत्न करीत आहे. छगन भुजबळ हे ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी लढत असल्याचे सांगून समाज घटकांनी पक्षाला साथ देण्याची वातावरण निर्मिती करण्यात येईल. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला शासन म्हणून मराठा समाजाच्या प्रश्नांवरतीही सकारात्मक निर्णय घेऊन न्याय दिल्याचा प्रचार करता येईल, अशी राष्ट्रवादीची खेळी असेल, असे राजकीय जाणकरांनी सांगितले.
advertisement
अजित पवार यांच्या सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या प्रश्नांसाठी बैठका
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा, यावर भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कामाचा आढावा त्यांनी घेतला.
advertisement
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुरक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना अशा विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा. या योजनांची माहिती गरजूंपर्यंत योग्य प्रकारे पोहोचविणे ही महत्त्वाची जबाबदारी असल्याचे सांगून, योजनांचा प्रचार-प्रसार प्रभावीपणे करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.
advertisement
महामंडळा मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये तसेच योग्य लाभार्थ्यांची निवड करून त्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळावी यासाठी यंत्रणांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महामंडळाच्या योजनांमुळे तरुणांना व्यवसाय, उद्योग व उद्यमशीलतेसाठी प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे राज्यात स्वयंरोजगाराच्या संधी वाढीस लागून आर्थिक प्रगतीला चालना मिळते. त्यामुळे या योजना अधिक प्रभावीपणे राबवून त्याचे परिणाम समाजाच्या तळागाळापर्यंत दिसून यावेत, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 9:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकीकडे भुजबळ ओबीसींसाठी मैदानात, दुसरीकडे अजितदादांचा मराठ्यांसाठी पुढाकार, राष्ट्रवादीचं सोशल इंजिनिअरिंग!