BJP-MIM युती, फडणवीस म्हणाले अजिबात सहन करणार नाही, चव्हाणांकडून कारणे दाखवा नोटीस
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अकोटमधील युती मान्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
अकोला : अकोट नगरपरिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी करण्यात आलेली भाजप आणि एमआयएमची अभद्र युती सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. या युतीवर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत असतानाच, आता एमआयएमकडून या प्रकरणावरून यू-टर्न घेण्यात आला आहे. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अकोटमधील युती मान्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. कोणत्याही परिस्थितीत ही युती खपवून घेणार नाही. एमआयएमशी युती केल्याने स्थानिक नेत्यांवर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.
एमआयएमचे नेते युसुफ पुंजाजी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले असून, एमआयएमच्या उमेदवारांना विश्वासात न घेता ही युती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अकोट येथील आघाडीतील नगरसेवकांनी ‘अकोट विकास मंच’ स्थापन केल्याचा सुरुवातीला बोलण्यात आले होते. मात्र यामध्ये युतीचे घटक पक्ष दिसून आल्याचं ते म्हणाले. या सर्व घडामोडींनंतर एमआयएम या युतीतून बाहेर पडल्याचे युसुफ पुंजाजी यांनी स्पष्ट केलं आहे.
advertisement
एमआयएम पक्षासोबत नव्हे, तर केवळ उमेदवारांशी युती केली होती, भाजपचा हास्यास्पद दावा
दरम्यान, भाजपकडूनही या युतीबाबत काहीशी माघार घेतल्याचं चित्र दिसत आहे. एमआयएम पक्षासोबत नव्हे, तर केवळ उमेदवारांशी युती केल्याचा दावा भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे. भाजपची विचारधारा मान्य करून एमआयएम पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपासोबत येणाऱ्या उमेदवारांशीच युती कायम ठेवली जाईल, असंही सावरकर यांनी स्पष्ट केलं आहे.
advertisement
आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये? रविंद्र चव्हाण यांचे खरमरीत पत्र
दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही एमआयएमसोबत युती केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घडामोडींमुळे अकोट नगरपरिषदेतील सत्तास्थापनेचा पेच अधिकच वाढला असून, राजकीय वातावरण तापले आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये आपण अकोट नगरपरिषद मध्ये AIMIM सोबत युती करून, भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला आहे. तसेच असे करीत असताना कोणालाही विश्वासात न घेता आपल्या या कृतीतून पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत आपण तातडीने खुलासा करावा, असे रविंद्र चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.
view commentsLocation :
Akola,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 5:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP-MIM युती, फडणवीस म्हणाले अजिबात सहन करणार नाही, चव्हाणांकडून कारणे दाखवा नोटीस











