गव्हर्मेंटलाच गंडवलं, सगळं घबाड एकाच घरात आलं, मेळघाटच्या या कुटुंबानं असं काय केलं?
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Employment Fund Misuse Case : मेळघाटमध्ये रोजगार हमी निधीचा मोठा गैरवापर उघडकीस आला आहे. एका कुटुंबाने सर्व लाभ उचलल्याचे समोर आले. प्रशासनाने त्वरित चौकशी सुरू केली असून, या प्रकरणात दोषींविरुद्ध कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.
कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा म्हटलं की, अनेक कागदपत्र लागतात. त्यानंतर त्याची प्रक्रिया देखील लांब असल्याने अनेकजण या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. जिथे एका व्यक्तीला योजनेचा लाभ मिळत नाही तिथे एकाच घरातील 11 लोकांनी सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे. ही घटना चिखलदरा तालुक्यात घडली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) नावाखाली सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
चुरणी गावातील एका कुटुंबाने संगनमताने 11 सदस्यांच्या नावाने गोठा, घरकुल, विहीर, बांबू लागवड, फळबाग अशा अनेक योजनांचे लाभ घेतले. प्रत्यक्ष काम न करता फक्त कागदोपत्री अंमलबजावणी झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे मेळघाटातील प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल होताच प्रशासन हलले असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
advertisement
एकाच घरातील 11 जणांचा योजनांवर हक्क
रघुनाथ अमृतलाल टाले या व्यक्तीच्या कुटुंबाने पत्नी, मुले, सुना, अविवाहित मुली आणि मृत भावाच्या कुटुंबासह एकूण 11 जणांच्या नावाने योजना घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये शेळीपालन शेड, गाईचा गोठा, घरकुल, बांबू लागवड, फळबाग आणि सिंचन विहीर अशा सर्वच प्रकारच्या योजनांचा समावेश आहे. आश्चर्य म्हणजे, या सर्व योजना एकाच जागेवर दाखवून कागदोपत्रीच पूर्ण करण्यात आल्या असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
advertisement
नोकरदार मुलीच्याही नावावर घेतला योजनेचा लाभ
नियमांनुसार शासकीय अथवा खासगी नोकरी करणाऱ्या व्यक्तीस रोजगार हमी योजनेचा लाभ मिळत नाही. मात्र टाले कुटुंबातील दिव्यानी रघुनाथ टाले या खासगी बँकेत कार्यरत असतानाही त्यांच्या नावावर योजना मंजूर करण्यात आली. योजनेच्या कामासाठी त्यांचे नाव मस्टरवर दाखवण्यात आले असल्याने, एकच व्यक्ती एकाच वेळी दोन ठिकाणी काम कसे करू शकते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
advertisement
तक्रार आणि प्रशासनाची भूमिका
या संपूर्ण प्रकाराची तक्रार दिनेश लिंबा ब्राह्मणे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली असून सर्व कागदपत्रांसह पुरावे सादर करण्यात आले आहेत. या संदर्भात गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी सांगितले की, प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली आहे. चौकशीसाठी आदेश दिले आहेत. दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
या घटनेनंतर चुरणी गावात संतापाचे वातावरण आहे. स्थानिक ग्रामस्थांनी कायम गरीब शेतकऱ्यांना योजना मिळत नाहीत, मात्र काही प्रभावी कुटुंबांनी संगनमताने निधी लाटला, असा आरोप केला आहे. या प्रकाराने रोजगार हमी योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेचा गंभीर अभाव असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2025 1:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
गव्हर्मेंटलाच गंडवलं, सगळं घबाड एकाच घरात आलं, मेळघाटच्या या कुटुंबानं असं काय केलं?


