'मुलं येतील का?' म्हणत वृद्धाश्रमात वडिलांचा मृत्यू, मुलांनी शेवटच्या क्षणीही फिरवली पाठ!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरमधील 'कृपाळू वृद्धाश्रमात' दीड वर्षांपासून राहत असलेल्या दिनेश नावाच्या वडिलांचा त्यांच्या मुलांनी दुर्लक्ष केल्यामुळे दुःखद मृत्यू झाला. गंभीर असल्याचा...
छत्रपती संभाजीनगर : 'तुमचे वडील गंभीर आहेत. ते कधीही जग सोडून जाऊ शकतात. त्यांना लवकर भेटायला या.' कृपाळू वृद्धाश्रमातून दिनेश यांच्या मुलाला फोन गेला. मात्र, 'माझा आणि त्यांचा काहीही संबंध नाही,' असे म्हणून त्याने फोन कट केला. त्यानंतर गुरुवारी दुपारी वृद्धाश्रमातच दिनेश यांचा मृत्यू झाला. अखेरच्या क्षणापर्यंत 'मुलं आली का?' हाच प्रश्न ते विचारत राहिले, पण मुले त्यांना पाहायला आले नाहीत. या हृदयद्रावक घटनेमुळे वृद्धाश्रमातील कर्मचारी आणि संचालक भावूक झाले होते.
दीड वर्षांपूर्वी वृद्धाश्रमात आले
दीड वर्षांपूर्वी कृपाळू वृद्धाश्रमाचे संचालक संतोष (अण्णा) सुरडकर यांना टीव्ही सेंटर परिसरातील सुरक्षा रक्षकांचा फोन आला. त्यांच्यासोबत काम करणारे 65 वर्षीय दिनेश यांची मानसिक स्थिती ढासळली होती. त्यानंतर दामिनी पथकाच्या मदतीने त्यांना वृद्धाश्रमात आणण्यात आले. दामिनीने त्यांच्या शहरातील मुलाला फोन करून वडिलांना घेऊन जाण्याचा निरोप दिला, पण त्याने येण्यास नकार दिला. त्यांचा दुसरा मुलगा दुबईला राहतो. दिनेश वृद्धाश्रमात आल्यानंतर त्यांचा स्वभाव अतिशय चांगला होता आणि ते तिथे नव्याने आलेल्या मित्रांसोबत आनंदात राहत होते, असे सुरडकर यांनी सांगितले.
advertisement
शेवटच्या क्षणीही मुलांनी पाठ फिरवली
तीन महिन्यांपूर्वी दिनेश यांची तब्येत ढासळली. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तरीही मुले त्यांना भेटायला आली नाहीत. दुबईच्या मुलाने उपचारांसाठी काही पैसे पाठवले, आणि त्यातून ते बरे झाले. पण आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्यांची तब्येत बिघडली. त्यावेळी त्यांनी, 'आता काही मी जगत नाही, माझ्या मुलांना बोलवा,' असा निरोप दिला. दोन्ही मुलांनी पुन्हा एकदा येण्यास नकार दिला.
advertisement
दिनेश यांचा श्वास गुरुवारी मंदावत होता. सुरडकर यांनी त्यांना शेवटचे विचारले, 'तुमची शेवटची इच्छा काय आहे?' त्यावर त्यांनी डोळ्यात पाणी आणून फक्त एकच प्रश्न विचारला, 'माझी मुलं येतील का?' त्यानंतर त्यांनी 'तुम्ही माझ्यासाठी खूप केले,' असे म्हणून कायमचे डोळे मिटले.
भावनाशून्य मुलांचे उत्तर
दिनेश यांचा मृत्यू झाल्यानंतर संचालकांनी दोन्ही मुलांना पुन्हा फोन केला. दुबईच्या मुलाने वडील गेल्याची बातमी ऐकताच भावनाशून्यपणे, 'मी पैसे पाठवतो. तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या,' असे सांगितले, तर शहरातील मुलाने तर फोनच उचलला नाही. संतोष (अण्णा) सुरडकर म्हणाले, "दिनेश शेवटच्या क्षणापर्यंत फक्त मुलांची वाट पाहत होते. त्यांना फक्त एकदाच मुलांना भेटायचे होते. मी त्यांच्या शहरातील मुलाला अनेकदा फोन केले, पण तो आलाच नाही, याचे खूप वाईट वाटले."
advertisement
हे ही वाचा : कुटुंबावर क्रूर आघात! मुलाच्या मृत्यूचा धक्का झाला नाही सहन; अवघ्या 5 तासांत आईने घेतला जगाचा निरोप
हे ही वाचा : नियतीचा क्रूर खेळ! चिमुरडीचा जन्म 'हीच' आईच्या मृत्यूची आठवण ठरली; घर पूर्ण झालं, पण...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 08, 2025 12:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
'मुलं येतील का?' म्हणत वृद्धाश्रमात वडिलांचा मृत्यू, मुलांनी शेवटच्या क्षणीही फिरवली पाठ!