आकाचा फास आणखी घट्ट आवळणार, महादेव मुंडे प्रकरणात बजरंग बाप्पा थेट अमित शाहांकडे!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Mahadev Munde Murder Case: महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर परळीतील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडने पोलिसांना फोन केले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास थांबला, असा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला होता.
नवी दिल्ली : परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, खासदार बजरंग सोनवणे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा न्यायासाठी संघर्ष सुरू आहे. मात्र सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप करून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर थेट देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी बजरंग सोनवणे करणार आहेत. या भेटीमुळे बीडच्या आकाभोवतीचा फास अधिक घट्ट आवळणार असल्याचा अंदाज आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचा सहकारी बाळा बांगर याने मोठे खुलासे केले आहेत. वाल्मिक कराड यानेच महादेव मुंडे प्रकरणातील प्रत्यक्षदर्शिला संपविल्याचा दावा त्याने केला.
महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर परळीतील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडने पोलिसांना फोन केले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास थांबला. १८ महिने होऊनही तपास लागलेला नाही, असा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला होता. गेल्या आठवड्यात बजरंग सोनवणे यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेऊन केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटतो, असा शब्द दिला होता.
advertisement
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार आजपासून सुरू झाले आहे. बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची वेळ मागितलेली आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदने दिली, उपोषणे केले, आंदोलन केली मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. मागील आठवड्यात तर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. पीडितांना न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर प्रकरण सांगणार आहे, असे बजरंग सोनवणे म्हणाले.
advertisement
अमित शाह यांच्या भेटीत आम्ही केवळ महादेव मुंडे हत्या प्रकरणच नाही तर बीडमधील अजूनही बरीच प्रकरणे मांडणार आहोत. बीडमधील खून अपहरण आदी विषय आम्ही त्यांच्यासमोर मांडून न्यायाची मागणी करणार आहोत, असे बजरंग सोनवणे म्हणाले.
महादेव मुंडे हत्या प्रकरणात आवश्यक ती कारवाई सुरू असून या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिला. पोलिसांची चौकशी सुरू असून दोषींना सोडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 21, 2025 5:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आकाचा फास आणखी घट्ट आवळणार, महादेव मुंडे प्रकरणात बजरंग बाप्पा थेट अमित शाहांकडे!










