Beed News: मंत्रालयातील नोकरीसाठी 12 लाखांची डील, मुलीला..., बीडमध्ये धक्कादायक प्रकार समोर
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Beed News: पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने केवळ 2 लाख रुपये परत केले, तर उर्वरित 10 लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली.
बीड: मुलीला मंत्रालयात लिपिक पदावर नोकरी मिळवून देतो, असे खोटे आश्वासन देत एका व्यक्तीकडून तब्बल 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बीड जिल्ह्यात समोर आला आहे. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. नोकरीच्या आशेने दिलेले पैसे परत न मिळाल्याने संबंधित कुटुंबावर आर्थिक व मानसिक ताण निर्माण झाला आहे.
याप्रकरणी सुनील लक्ष्मण यादव (वय 47, रा. हनुमाननगर, एमआयडीसी, बीड) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, काही वर्षांपूर्वी त्यांची ओळख सोलापूर जिल्ह्यातील अजनाळे येथील विलास मधुकर येलपल्ले याच्याशी झाली होती. ही ओळख पुढे विश्वासात बदलली आणि त्याचाच गैरफायदा आरोपीने घेतल्याचा आरोप आहे.
advertisement
मार्च 2025 मध्ये विलास येलपल्ले हा सुनील यादव यांच्या घरी आला होता. यावेळी त्याने मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचा दावा केला. या ओळखीच्या जोरावर यादव यांच्या मुलीला मंत्रालयात लिपिक पदावर कायमस्वरूपी नोकरी लावून देऊ, असे आमिष त्याने दाखवले. सुरुवातीला यासाठी 14 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.
यानंतर तडजोड होऊन 12 लाख रुपयांत व्यवहार निश्चित झाला. यादव यांनी विश्वास ठेवून टप्प्याटप्प्याने आरोपीकडे ही रक्कम दिली. मात्र, बराच कालावधी उलटूनही मुलीला कोणतेही नियुक्तीपत्र किंवा अधिकृत कागदपत्र मिळाले नाही. वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संशय बळावला.
advertisement
पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने केवळ 2 लाख रुपये परत केले, तर उर्वरित 10 लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुनील यादव यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीवरून पेठ बीड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध आणि पुढील चौकशी सुरू केली आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 2:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed News: मंत्रालयातील नोकरीसाठी 12 लाखांची डील, मुलीला..., बीडमध्ये धक्कादायक प्रकार समोर









