BMC Election Results Ward 194: आधी वडिलांना पाडलं, आता मुलाला धूळ चारली, ठाकरेंच्या शिलेदाराने शिंदेच्या नेत्याचा हिशोब चुकता केला
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election Results: प्रभादेवीमधील वॉर्ड १९४ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून समाधान सरवणकर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मुंबई: मुंबईतील महत्त्वाच्या हायव्होल्टेज लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. प्रभादेवीमधील वॉर्ड १९४ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून समाधान सरवणकर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. चुरशीच्या लढतीत ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे यांनी सरवणकरांचा पराभव केला आहे. विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांना ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी पराभव केला होता. त्यानंतर आता सरवणकरांच्या लेकाचा पराभव ठाकरे गटाचे उमेदवार निशिकांत शिंदे यांनी केला आहे.
वॉर्ड क्रमांक १९४ मधून मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी व ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांनी दावा केला होता. उद्धवसेवेकडे प्रभाग गेल्याने धुरी नाराज झाले होते. येथे आता समाधान सरवणकर व निशिकांत शिंदे अशी लढत झाली. चुरशी झालेल्या लढतीत निशिकांत शिंदे यांनी समाधान सरवणकर यांचा अवघ्या ५९२ मतांनी पराभव केला.
advertisement
दादर-प्रभादेवीतील वॉर्ड १९४ मध्ये हायव्होल्टेज लढत होती. शिवसेनेतील फुटीनंतर हा वॉर्ड शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उबाठा) यांच्यातील संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला होता. आजी आमदार महेश सावंत यांनी पुन्हा एकदा कधी काळचे गुरू माजी आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात शड्डू ठोकला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता सरवणकर यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत होती.
प्रभादेवी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर या ठिकाणी शिंदे गट आणि ठाकरे गटात संघर्ष उफाळून आला होता. यावेळेस या प्रभागात थेट आजी आणि माजी आमदारांच्या वर्चस्वाची लढाई पाहायला मिळत आहे.
advertisement
सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात मागील काही वर्षांपासून संघर्ष वाढला आहे. २०१७ मध्ये महेश सावंत यांना डावलून सदा सरवणकर यांनी मुलगा समाधान सरवणकर याच्यासाठी उमेदवारी घेतली. त्यानंतर सावंत यांनी बंडखोरी केली. मात्र, त्यांना अवघ्या २५२ मतांनी पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर महेश सावंत यांनी शिवसेनेत घरवापसी केली. शिवसेना फुटल्यानंतर सदा सरवणकर हे शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर प्रभादेवीत दोन्ही गटात राडा झाला. एका प्रसंगात सरवणकर यांनी पिस्तुलीतून गोळी झाडल्याचाही आरोप झाला.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 12:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election Results Ward 194: आधी वडिलांना पाडलं, आता मुलाला धूळ चारली, ठाकरेंच्या शिलेदाराने शिंदेच्या नेत्याचा हिशोब चुकता केला










